माणसाचं वय जसजसं वाढत जातं, तसतसा त्याच्या गाठीशी अनुभव येतो आणि तो अधिक परिपक्व होतो. तारूण्यातलं उसळतं रक्त चाळीशीच्या आसपास शांत होतं आणि माणूस थंड डोक्याने विचार करू लागतो. सचिनबाबत हे जरा वेगळं आहे. त्याला मी लहान असल्यापासून पाहात आलोय. त्यावेळीसुद्धा त्याची गुणवत्ता आणि परिपक्वता वाखाणण्याजोगी होती. आपण परिस्थितीनुरूप कसं खेळायला हवं, कोणत्या गोलंदाजीचा कसा सामना करायचा, संघाची गरज काय आहे, हे तो खुबीनं समजायचा. त्यानंतर या सर्व गोष्टींचा बारकाईनं विचार करून तो मैदानावर उतरायचा. आता जसजसं सचिनचं वय वाढतंय, तशी त्याची परिपक्वताही अधिक समर्थपणे जाणवतेय. चाळीस वष्रे सतत खेळणं ही काही चेष्टेची बाब नाही. सचिन हा खरंच महान क्रिकेटपटू आहे. तो अजूनही त्याच जोमान खेळतोय, क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्या गुणगानाचे पोवाडे रचण्यास शब्द कमी पडतात. भारत हा भाग्यवान देश आहे, कारण येथे सचिनसारखा अचाट गुणवत्ता असलेला क्रिकेटपटू जन्माला आला.
सचिन हे एक वेगळेच क्रिकेटमय रसायन आहे. तो नेहमी क्रिकेटचाच विचार करतो. खाताना, जेवताना, फिरताना, जगताना त्याला क्रिकेटशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. फार काय, त्याच्या स्वप्नातसुद्धा फक्त क्रिकेटच असतं. याचप्रमाणे सचिन प्रखर इच्छाशक्तीचा अद्भूत अविष्कार आहे. तो सच्चा माणूस आहे. तो कधीच कुणाला उलट उत्तर देत नाही. आपली गुणवत्ता आणि बॅटच्या जोरावर सर्वाना दाखवून द्यायचं, हेच धोरण तो टीकाकारांच्या बाबतीतही जोपासतो. क्रिकेट हेच आपलं सर्वस्व आहे, हे त्याला बालवयातच कळून चुकलंय. त्यामुळे क्रिकेटकडेच त्यानं आपलं लक्ष केंद्रीत केलंय. हे ‘पॅशन’ त्यानं जीवापाड जोपासलंय. त्यामुळे तो क्रिकेटवर अधिराज्य गाजवू शकला.
क्रिकेटपटूची चाळीशी म्हटली की, शारीरिक आणि मानसिक आव्हानं ही ओघानंच येतात. पण मानसिकता ही वयापेक्षा वैचारिकतेवर जास्त अवलंबून असते. आपण एखाद्याची साठी झाली की तो म्हातारा झाला, असं सहजपणे म्हणतो. पण शेवटी कार्य करण्याची क्षमता आणि तत्परता याच कसोटय़ांवर एखादा वृद्ध आहे की नाही ते ठरते. सचिनचं वयाच्या १४व्या वर्षी जे ‘पॅशन’ आणि खेळाची ओढ होती, ती आज वयाच्या चाळीसाव्या वर्षीसुद्धा तशीच आहे. त्यात तसूभरही फरक पडलेला नाही.
सचिनला आजही क्रिकेट खेळायची तेवढीच आवड आहे. त्याच्या आवडत्या खेळाचा तो तितकाच आनंद लुटतो. जोवर सचिन खेळाचा आनंद लुटेल, संघाला मदत करेल, युवा खेळाडूंना त्याचं मोलाचं मार्गदर्शन लाभेल, तोपर्यंत त्यानं क्रिकेट खेळत राहावं.
सचिनसोबत मी प्रशिक्षकाची भूमिका बजावत असतानाच्या अनेक आठवणी मी जोपासल्या आहेत. यापैकी एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अविस्मरणीय विजय. त्या सामन्यात सचिननं आपल्या अखेरच्या षटकात सामना जिंकून देण्याची किमया साधली होती. शेवटचं षटक भारतीय संघातील सर्वात अनुभवी कपिल देवनं टाकावं, हे आमचं आधीच ठरलं होतं. पण त्याचा हात दुखत होता. त्यामुळे कपिल शेवटचं षटक टाकू शकणार नव्हता. कप्तान मोहम्मद अझरुद्दीन पेचात आहे, हे सचिनला कळून चुकलं होतं. त्यानं अझरकडून चेंडू हातात घेतला. त्यावेळी अझरनं ड्रेसिंग रूममध्ये माझ्याकडे पाहिलं. मी सचिनला षटक टाकू दे, अशी हाताच्या इशाऱ्यानं सकारात्मकता दर्शवली. मग सचिननं आपल्या लाजवाब गोलंदाजीच्या बळावर भारताला तो सामना जिंकून दिला.
सचिनची दुसरी आठवण म्हणजे ऑकलंडची. न्यूझीलंडविरुद्धचा तो एकदिवसीय सामना होता. संघ आमचा निश्चित झाला होता. त्यामुळे नाणेफेकीच्या आधी आम्ही थोडा सराव करीत होतो. मी, अझर, सचिन आणि कपिल असे चौघे जण नाणेफेक याचप्रमाणे सामन्याचे अन्य आराखडे बांधत होतो. तितक्यात नवज्योतसिंग सिद्धू आला आणि म्हणाला, ‘‘मी सराव करीत असताना माझा पाय दुखावला आहे, त्यामुळे मी खेळू शकणार नाही.’’ सिद्धू आणि मनोज प्रभाकर भारताच्या डावाला प्रारंभ करणार होते. पण आता ५-१० मिनिटांत तुम्ही नवा सलामीवीर कुठून आणणार? हा सवाल सर्वापुढे होता. कपिल आणि अझर हे निरुत्तर होते. पण सचिननं क्षणार्धात विचारलं, ‘‘मी सलामीला फलंदाजीसाठी उतरलं तर चालेल का?’’ मग मी सचिनला सांगितलं की, ‘‘तू सलामीला जा, पण तुझी विकेट आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. समोरून एखाद-दुसरे फलंदाज बाद झाले तरी तो मैदानावर टिकून राहायला पाहिजे. नव्या चेंडूवर काहीही होऊ शकतं.’’ पण सचिनचा आत्मविश्वास दृढ होता. ‘‘तुम्ही काहीच काळजी करू नका. मी नक्की चांगल्या धावा काढेन’’, असं त्यानं मला सांगितलं. तो आपल्या शब्दाला जागला. मॉरिसन वगैरसारख्या किवी गोलंदाजांवर सचिननं तुफानी हल्ला चढवला आणि एक दमदार खेळी साकारली. त्यानंतर सचिन सलामीच्या स्थानावरच खेळू लागला. त्यानं सौरव गांगुलीसोबत सलामीला उतरून अनेक विक्रमही नोंदवले. आपण संघाला नक्कीच संकटातून बाहेर काढू शकू, हा प्रखर विश्वास त्याच्यात होता.
डॉन ब्रॅडमन, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधील अद्वितीय खेळाडू. त्यांच्यात तुलना करणं चुकीचं ठरेल. ब्रॅडमनला मी पाहिलं नाही. पण त्याला अजूनही लोक क्रिकेटचा राजा मानतात. पण सुनील गावस्करला मी पाहिलंय. त्यावेळी हॅल्मेट, आर्मगार्ड, वगैरेसारखी सुरक्षाकवच नव्हती. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, त्या काळात वेस्ट इंडिजकडे जगातील सर्वोत्तम असा आग ओकणारा वेगवान मारा होता. याचप्रमाणे त्यावेळी बाऊन्सर, बिमर यांच्यावर मर्यादा नव्हती. पण त्या परिस्थितीत सुनीलनं सर्वाधिक शतकं झळकावली आहेत. पण ती परिस्थिती आणि आताची ही निराळी आहे.
सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धावांचा, शतकांचा आणि विक्रमांचा विचार केल्यास सचिन तेंडुलकर हा अभिजात आहे. भूतकाळात जसा सचिन निर्माण झाला नव्हता, तसा इतकी गुणवत्ता असलेला दुसरा पराक्रमी सचिन निर्माण होणार नाही. तब्बल १००शतके सचिनच्या खात्यावर जमा आहेत. त्याच्या तोडीचा किंवा त्याच्या जवळपास जाणाराही खेळाडू कुणी जन्माला येईल, असे मला वाटत नाही. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचे विश्वविक्रम आणि शतके त्याच्या नावावर आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत धावा काढण्याचे कसब त्याला ज्ञात आहे. त्यामुळे सचिनचे विक्रम मोडण्याचे आव्हान पेलण्यासाठी कोणती तरी महान शक्ती जन्माला यावी लागणार आहे आणि हे सर्व ३३ कोटी देवांनी एकत्रित येऊन केलं तरच शक्य होईल, एवढे त्यानं पराक्रम केले आहेत.
वयानुसार खेळावर बंधन येतं की नाही, हे प्रत्येक खेळाडूच्या वैचारिकतेवर अवलंबून असतं. जोपर्यंत एखाद्या खेळाडूला आपण खेळू शकणार नाही असे वाटत नाही, तोपर्यंत त्याने खेळायला काहीच हरकत नाही. सलामीवीर जेफ बॉयकॉट ४४व्या वर्षांपर्यंत खेळताना मी पाहिला आहे. इंग्लंडचा ??? इलिंगवर्थ ४३ वर्षांपर्यंत खेळत होता. हे प्रत्येकाला नाही साध्य होत. पण ज्या खेळाडूला आपण मैदानावर १०० टक्के खेळ देऊ शकतो याबाबत विश्वास आहे, त्यानं खेळायला काहीच हरकत नाही.
प्रसारमाध्यमे, काही क्रिकेटरसिक आणि स्टँडमध्ये बसून स्वत:ला डॉन ब्रॅडमन समजणाऱ्या क्रिकेटपटूंनी सचिनने निवृत्ती पत्करावी अशी मागणी केली होती. पण हा सल्ला देणाऱ्यांना क्रिकेटची कितपत माहिती आहे, हे आधी तपासून पाहायला हवं. सचिनच्या कामगिरीचे अशा रीतीने पृथक्करण करण्याची आवश्यकता नाही. परंतु ते करणाऱ्या व्यक्तीचीही तेवढी योग्यता हवी. सचिनला स्वत:लाही माहीत आहे की अजून आपलं क्रिकेट बाकी आहे. तो खेळतो आहे, त्यामुळे संघातील आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंना विशेषत: युवा खेळाडूंना प्रेरणादायी वाटतं. क्रिकेटमधील दैवत आपल्यासोबत खेळतं आहे, याचं त्यांना अप्रूप असतं. त्यामुळे निवृत्तीच्या चर्चा आपण करण्यापेक्षा ते त्याच्यावरच सोपवलेलं बरं.
हो, कधीकधी सचिनच्या धावा होत नाही. पण म्हणून काय लगेच सचिनला निवृत्त करणे योग्य ठरणार नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. धावा होणं, बळी मिळणं, हे सारंच अनिश्चित असतं. इंग्लंडचा फलंदाज डेनीस कॉम्पटन सात वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर आठव्या डावात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक साकारू शकला. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. या खराब काळात आपण त्याचं मागचं कर्तृत्व विसरून, त्याची शंभर शतके, आव्हानात्मक विक्रम बाजूला ठेवून निवृत्त व्हायला सांगणं योग्य नाही.
(शब्दांकन : प्रशांत केणी)
सचिन.. एक वेगळं रसायन!
माणसाचं वय जसजसं वाढत जातं, तसतसा त्याच्या गाठीशी अनुभव येतो आणि तो अधिक परिपक्व होतो. तारूण्यातलं उसळतं रक्त चाळीशीच्या आसपास शांत होतं आणि माणूस थंड डोक्याने विचार करू लागतो. सचिनबाबत हे जरा वेगळं आहे. त्याला मी लहान असल्यापासून पाहात आलोय.
First published on: 24-04-2013 at 04:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin is different chamical