सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा राजदूत आहे. अर्थात आम्ही केवळ सचिन नव्हे तर भारताच्या सर्वच खेळाडूंवर लक्ष केंद्रित करीत आहोत, असे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी याने सांगितले.
‘‘सचिन हा जगातील सर्वात महान क्रिकेटपटू आहे. गेली २४ वर्षे त्याने क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडले आहेत. त्याहीपेक्षा त्याने क्रिकेटला खूप उंचीवर नेले आहे असे सांगून सॅमी म्हणाला, सचिनविषयी आम्हा सर्वाना आदर आहे. त्याचे कारकीर्दीतील हे अखेरचे दोन सामने असल्यामुळे आम्हालाही त्याच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. तो जर पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तर आम्हाला खूपच आनंद होईल. त्याचे शतक पूर्ण होणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहील. कारण तो भारताच्या फलंदाजीचा कणा आहे. त्याला लवकरात लवकर बाद करण्याचे आमचे ध्येय असेल. सचिनचा मी चाहता आहे. मुंबई येथे होणाऱ्या त्याच्या अखेरच्या कसोटीत आम्ही देखील त्याला आदरयुक्त निरोप देणार आहोत,’’ असे सॅमीने सांगितले.
सॅमी पुढे म्हणाला, ‘‘लॉर्ड्स येथे २००३-०४ मध्ये त्सुनामी प्रलयग्रस्तांच्या मदतीसाठी एमसीसी विरुद्ध शेषविश्व सामना आयोजित केला होता. त्या वेळी माझी सचिनशी भेट झाली होती. त्याची ही भेट माझ्यासाठी सन्मानच होता.’’

Story img Loader