‘‘मुंबईची परंपरा आहे खडूस क्रिकेटची. सचिन तेंडुलकरने आपल्या अखेरच्या रणजी सामन्यात नेमकी हीच मुंबईची जिद्द दाखवून दिली. सचिन खऱ्या अर्थाने खडूस खेळला आणि १७५ चेंडूंचा सामना करीत नाबाद ७९ धावांची खेळी साकारली,’’ असे मत मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘बन्सी लाल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी आणि सामन्यातील परिस्थिती ही मुळीच अनुकूल नव्हती. अजय जडेजाचे नेतृत्व, हरयाणाची गोलंदाजीची फळी आणि क्षेत्ररक्षण हे सारे अप्रतिम होते. परंतु सचिनने मुंबईच्या खडूस वृत्तीला साजेशी खेळी उभारत स्वत:ला आणि संघाला एक आनंददायी भेट दिली.’’
‘‘सचिनला दमदार विजयाची भेट द्यावी, अशी योजना मुंबईच्या संघाने आखली होती. परंतु सचिनने स्वत:च्याच योगदानाने ही विजयाची भेट दिली. यापेक्षा चांगला विजयाचा अध्याय लिहिलाच जाऊ शकत नाही. त्यामुळेच हा अध्याय संस्मरणीय ठरला,’’ असे कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
‘‘सामन्याआधीच्या मुंबईच्या संघाच्या बैठकीतच सचिनने सर्वाना सांगितले होते की, फक्त सामन्यावर लक्ष केंद्रित करा. सचिनच्या निवृत्तीचे सावट सर्वावरच होते. परंतु सामना सुरू झाल्यावर सचिनच्या शब्दांना आम्ही जागलो,’’ असे कुलकर्णी यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘‘मुंबईच्या रणजी हंगामाची सुरुवात चांगली झाली. निर्णायक विजयाचे महत्त्व आम्हाला ठाऊक आहे. गेल्या वर्षी सातव्या सामन्यात आम्हाला निर्णायक विजय दृष्टिपथास पडला होता.’’
सचिनने स्वत:लाच विजयाची भेट दिली -जडेजा
पीटीआय, लाहली
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नाबाद ७९ धावांची खेळी करत हरयाणाविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ‘‘सचिनने स्वत:लाच विजयाची भेट दिली,’’ असे हरयाणाचा कर्णधार आणि भारताचा माजी सलामीवीर अजय जडेजा याने सांगितले.
‘‘सचिनच्या खेळीने सामन्याला कलाटणी मिळाली. सचिन अखेपर्यंत बाद होत नव्हता, याचाच अर्थ तो आमच्या विजयात अडसर बनून उभा होता. आम्हाला विजयाची अखेपर्यंत संधी होती. या सामन्यासाठी आमची रणनीती परिस्थितीनुसार बदलत होती. पण आमचे सर्व लक्ष सचिनभोवती केंद्रित झाले होते. पण मुंबईसारख्या बलाढय़ संघाला कडवी लढत देऊ शकलो, याचेच समाधान अधिक आहे,’’ असेही जडेजाने सांगितले.