स्पायडरमॅन, सुपरमॅन किंवा बॅटमॅन यांसारखे अनेक महानायक लहान मुलांना प्रेरणा निर्माण करतात. परंतु भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘महानायक’ मानतो. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोहलीने सचिन मला नेहमीच प्रेरणा देतो, असे सांगितले.
‘‘सचिन तेंडुलकर हा माझ्यासाठी आयुष्यभर महानायक असेल,’’ असे कोहली यावेळी म्हणाला. ‘मॅक्स स्टील’ या महानायकाचे शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. कोहली या महानायकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.
बुधवारपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २४ वर्षीय विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी क्रिकेटमधील नायक आणि खलनायक या विषयावर बोलला. तो म्हणाला, ‘‘क्रिकेट या खेळात जो खेळाचा यथोचीत आदर राखतो, तो नायक म्हणावा आणि जो खेळाची प्रतिमा डागाळतो किंवा ज्याच्यावर कारवाई होते, त्याला खलनायक म्हणावे.’’
यावेळी विराट म्हणाला, ‘‘माझ्या बॅटला मी खेळणे समजत नाही. ते माझे शस्त्र आहे. या बॅटने मला आयुष्यातील सर्व काही मिळवून दिले आहे. मैदानावर हवे ते करण्यासाठी हीच बॅट मला मदत करते.’’
दोन विविध वयोगटांच्या विश्वविजेत्या संघाचा विराट कोहली सदस्य होता. २००७मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर २०११च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. कॅरेबियन दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीला दुखापत झाल्यावर कोहलीकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती1 तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा २२वा कर्णधार ठरला आहे. भारताचा भावी कप्तान असे कोहलीला संबोधण्यात येते. तो म्हणतो, ‘‘आघाडीवर राहून नेतृत्व करायला मला खूप आवडते. जबाबदारी घ्यायला मी नेहमीच उत्सुक असतो. हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे.’’
आयसीसी चॅम्पियन्स करंडकापाठोपाठ भारतीय संघाने वेस्ट इंडिजमधील तिरंगी क्रिकेट स्पर्धा जिंकली. याचप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. यासंदर्भात कोहली म्हणतो, ‘‘भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे. संपूर्ण यशाची मी हमी देऊ शकणार नाही. परंतु याचप्रकारे जर भारताची सातत्यपूर्ण कामगिरी राहिली तर भारतीय क्रिकेटसाठी भविष्यकाळ चांगला असेल. अशा अनेक गोष्टींमुळे आम्ही क्रिकेटरसिकांना आनंद देऊ शकू.’’
सचिनने निधडय़ा छातीने खेळावे- अझरुद्दीन
चाळिशीत प्रवेश केलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निधडय़ा छातीने खेळण्याचा सल्ला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने दिला आहे. वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना करण्यासाठी सचिनने ‘ओपन स्टान्स’ पद्धतीने खेळावे असे अझरुद्दीनला वाटते. गेल्या काही सामन्यांमध्ये सचिन त्रिफळाचीत होताना दिसत आहे. अशा पद्धतीने बाद होणे टाळण्यासाठी ओपन स्टान्स उपयुक्त ठरू शकतो. या पद्धतीमुळे स्विंग चेंडू खेळण्यासाठी सचिनला थोडा अधिक वेळ मिळू शकेल.