आयुष्यभर क्वचितच आपल्या भावनांचे जाहीर प्रदर्शन करणे टाळणाऱ्या सचिनने शनिवारी मात्र, अवघ्या देशाला भावूक करून सोडले. डोळ्यांतले अश्रू रोखत आणि गळ्यात येणारा आवंढा गिळत सचिनने वानखेडेवर पंधरा मिनिटे भाषण केले. सचिनचे ते मनोगत ऐकताना सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचे डोळे ओले झाले. क्रिकेट रसिकच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या या भाषणाचा गोषवारा.
मित्रहो, आता पुरे नाहीतर मी अधिक भावूक होईन. मला बोलायचं आहे. गेली २४ वर्षे माझं आयुष्य या २२ यार्डात होतं. हा अविस्मरणीय प्रवास आज संपलाय, यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय. पण आजच्या या क्षणी मला माझ्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांचे आभार मानायचे आहेत.
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती, ज्यांची मला १९९९पासून फार उणीव जाणवतेय ते म्हणजे माझे बाबा. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय, मी तुमच्यासमोर उभा राहूच शकलो नसतो. मी ११ वर्षांचा असताना त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं आणि म्हटलं की ‘तू तुझी स्वप्नं गाठली पाहिजेत. पण त्यासाठी कोणताही जवळचा मार्ग शोधू नकोस. तुझा मार्ग खडतर असेल. पण माघार घेऊ नकोस.’ मी फक्त त्यांच्या या सांगण्याप्रमाणे चाललो. जेव्हा जेव्हा मी (मैदानात) चांगली खेळी केली, तेव्हा तेव्हा मी आकाशाकडे बघून बॅट दाखवायचो. ते माझ्या बाबांसाठी होतं.
माझ्या आईने, माझ्यासारख्या द्वाड मुलाला कसं सांभाळलं, हे मला आजपर्यंत समजलेलं नाही. ती प्रचंड संयमी आहे. मी भारतासाठी खेळलेल्या २४ वर्षांत तिने माझी काळजी घेतली. पण मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून ती माझ्यासाठी प्रार्थना करायची. तिच्या प्रार्थना आणि आशीर्वाद यांनी मला मैदानात जाऊन चांगली कामगिरी करण्याची शक्ती दिली. आई, तू माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक त्यागासाठी तुझे खूप खूप आभार.
माझी शाळा घरापासून लांब होती. त्यामुळे माझ्या शालेय दिवसांतील चार वष्रे मी काका-काकींसोबत राहिलो. पण त्यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. दिवसभर खेळून थकलेला मी रात्री दमून अर्धवट झोपेत असायचो. पण माझी काकी मला तशा अवस्थेत जेवण भरवायची. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी खेळायला जायचो. हे क्षण विसरणं मला कधीच शक्य नाही.  
माझा मोठा भाऊ नितीन आणि त्याच्या कुटुंबाने मला नेहमीच प्रोत्साहन दिले. माझ्या मोठय़ा भावाला जास्त बोलायला आवडत नाही, पण एक गोष्ट तो मला नेहमी सांगतो, ‘तू जे काही करशील, त्यासाठी शंभर टक्के योगदान देशील. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.’ त्याचं प्रोत्साहन माझ्यासाठी खूप काही आहे. माझ्या आयुष्यातली पहिली बॅट मला माझी बहिण सविताने भेट म्हणून दिली होती. तेथून माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली. आजही माझी फलंदाजी सुरू असते, तेव्हा उपवास करणाऱ्या अनेकांमध्ये सविताही असते.
अजित, माझा भाऊ.. त्याच्याबद्दल मी काय बोलू? हे संपूर्ण स्वप्न आम्ही दोघं मिळून जगलो. माझ्यासाठी त्याने त्याचं करिअर त्यागलं. मी अकरा वर्षांचा असताना त्यानं माझ्यातली गुणवत्ता हेरली आणि मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला. तिथून माझं आयुष्य बदललं. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण यापुढे मी फलंदाजी करण्याची शक्यता कमी असतानाही काल रात्रीत्याने मला फोन करून माझ्या बाद होण्याविषयी चर्चा केली. माझ्या जन्मापासून आमच्या दोघांत जे बंध जुळले आहेत, ते यापुढेही असेच राहतील. माझ्या तंत्राबाबत आमच्यात एकमत होतं. पण अनेक तांत्रिक गोष्टींबाबत मला त्याचं म्हणणं पटायचं नाही. आमच्यात वाद आणि चर्चाही झडायची. पण आज त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहिल्यावर जाणवतं की त्याशिवाय मी मोठा क्रिकेटपटू बनू शकलो नसतो.
माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट १९९० साली घडली, जेव्हा मी अंजलीला भेटलो.  तिच्याशिवाय मी मुक्तपणे आणि दडपणाशिवाय क्रिकेट खेळू शकलो नसतो. माझा राग, निराशा आणि काहीबाही बोलणं सहन केल्याबद्दल तिचे धन्यवाद. अंजली, माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम भागीदारी तुझ्यासोबत आहे. त्यानंतर माझ्या आयुष्यात दोन अनमोल रत्ने आली आणि ती म्हणजे सारा व अर्जुन. ते आता मोठे झालेले आहेत. त्यांचा वाढदिवस, शाळेतला वार्षिक दिवस, क्रीडा दिन, सुट्टय़ांवर जाणं अशा अनेक विशेष घटनांच्या वेळी मला त्यांच्यासोबत रहायचं होतं. पण या सर्वाना मी मुकलो. त्यासाठी मला समजून घेतल्याबद्दल त्यांचे आभार. गेली १४ आणि १६ वर्षे मी तुमच्यासोबत व्यवस्थित घालवू शकलो नाही. पण पुढची १६ किंवा त्याहून अधिक वर्षे माझं सर्व काही तुम्हीच असाल.  
गेली २४ वर्षे भारतासाठी खेळताना मी अनेक नवे मित्र कमावले. आणि त्याही आधी माझ्या बालपणीचे अनेक मित्र मला मिळाले. मी त्यांना सरावासाठी बोलवायचे, तेव्हा ते आपली सगळी कामं सोडून धावत यायचे. सुट्टीत फिरायला जाणं असो की क्रिकेटवर चर्चा करायची असो किंवा मी दडपणाखाली असताना माझी कामगिरी सुधारण्यासाठी उत्तर शोधणं असो.. प्रत्येक क्षणी माझे मित्र माझ्यासोबत राहिले. दुखापतींमुळे माझी कारकीर्द संपतेय असं अनेकदा वाटायचं. पण त्यावेळीही पहाटे तीन वाजता उठून माझे हे मित्र माझ्यासोबत फिरायला यायचे आणि मला विश्वास द्यायचे. त्यांच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. त्यांचेही आभार!
अकरा वर्षांचा असताना अजितने मला आचरेकर सरांकडे नेलं. तो माझ्या कारकिर्दीचा ‘टर्निग पॉइंट’ होता. मैदानात खेळताना, त्यांना स्टॅण्डमध्ये पाहून मला खूप आनंद झाला. गेल्या २९ वर्षांमध्ये सर मला कधीही ‘वेल प्लेड’ म्हणालेले नाहीत. कारण मी बेसावध होईन आणि मेहनत करायचे थांबवेन, असे त्यांना वाटायचे. सर, कदाचित आता तुम्ही तसं म्हणू शकता. कारण, यापुढे माझ्या आयुष्यात आणखी सामने होणार नाहीत.
या मैदानावर मुंबईसाठी माझ्या क्रिकेटला सुरुवात झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशन मला प्रिय आहे. मला आठवतेय, जेव्हा मी पहाटे चार वाजता न्यूझीलंडहून येत होतो आणि आठ वाजता सामना सुरू होणार होता. तेव्हा मला मुंबईकडून खेळायचे होते आणि त्या वेळी कुणीही माझ्यावर दबाव आणला नाही. मी खेळलो कारण मुंबई क्रिकेटवर मनापासून असलेले प्रेम आणि त्यासाठीच धन्यवाद.  
नक्कीच, भारतासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते आणि त्याचबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर मी जोडलो गेलो. माझ्या पदार्पणापासून त्यांनी माझ्यातील क्षमतेवर विश्वास ठेवला आणि वयाच्या १६ वर्षांपासून त्यांनी माझी निवड केली, ही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल बीसीसीआयचे आभार.  
गेल्या २४ वर्षांमध्ये मी बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळलो आणि त्यापूर्वी बऱ्याच वरिष्ठ क्रिकेटपटूंना टीव्हीवर पाहिले. त्यांच्याकडूनच मला क्रिकेट खेळायची प्रेरणा मिळाली. या साऱ्या वरिष्ठ खेळाडूंचे आभार. दुर्दैवाने मला काही जणांबरोबर खेळता आले नाही, पण त्यांच्याबद्दल नेहमीच त्यांच्या योगदानाबद्दल मनात आदर असेल.
वानखेडेवरील मोठय़ा पडद्यावर आपण राहुल, लक्ष्मण, सौरव यांना पाहतोय. अनिल कुंबळे या सामन्याला उपस्थित नाही आणि माझे संघसहकारी माझ्यासमोर उभे आहेत. घराबाहेर असताना तुम्हीच माझ्या घरातील सदस्य होते. तुमच्यासोबतचे अनुभव अविस्मरणीय आहेत. यापुढे ‘ड्रेसिंग रूम’चा भाग होता येणार नाही, याचे वाईट वाटते. सर्व प्रशिक्षक, ज्यांचे मार्गदर्शन लाभले, ते माझ्यासाठी विशेष होते.
माझे डॉक्टर, फिजिओ आणि ट्रेनर यांचे आभार मानले नाहीत, तर मी माझ्या कर्तव्यात मागे पडल्यासारखे होईल. दुखापतींमुळे मला स्वत:ला तंदुरुस्त कसे ठेवायचे, हेच कळेनासे व्हायचे. पण या मंडळींच्या विशेष प्रयत्नांमुळे पुन्हा दुखापती माझ्या वाटय़ाला आल्या नाहीत. कोणत्याही क्षणी माझ्यासाठी डॉक्टर्स धावून यायचे. मी त्यांना कधीही मुंबई ते चेन्नई, मुंबई ते दिल्ली असे बोलवायचो. आपल्या हातातील काम टाकून आणि कुटुंबियांना सोडून ते मिळेल ते विमान पकडून माझ्यासाठी हजर असायचे. त्यामुळेच मला इतकी वर्षे खेळता आले.
माझा पहिला व्यवस्थापक आणि प्रिय मित्र मार्क मस्कारेन्हास याचे दुर्दैवाने २००१मध्ये एका अपघातात निधन झाले. तो माझ्या क्रिकेटचा आणि खासकरून भारतीय क्रिकेटचा निस्सीम चाहता होता. त्याचे क्रिकेटवर अपार प्रेम होते. देशाचे प्रतिनिधित्व करताना मी कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत, यासाठी त्याने माझ्यावर कधीही दडपण आणले नाही. त्याने याबाबत इतकी काळजी घेतली की त्याचे योगदान मी कधीही विसरू शकत नाही.
आता माझा ‘डब्लूएसजी’ हा व्यवस्थापकीय संघ मार्कप्रमाणेच जबाबदारी सांभाळत आहे. मी त्यांच्याशी करारबद्ध झालो तेव्हा मला त्यांच्याकडून काय हवे आहे, याची कल्पना दिली होती. माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी आपले काम चोखपणे बजावले आहे. माझा व्यवस्थापक विनोद नायडू हा गेली १४ वर्षे माझ्याबरोबर अगदी जवळून काम पाहत आहे. तो माझ्या कुटुंबाचाच एक भाग बनला आहे. माझ्या कामासाठी त्याने बराच त्याग केला आहे. कुटुंबियांना सोडून माझ्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी त्यांच्या कुटुंबियांचा ऋणी राहीन.
शालेय दिवसांमध्ये माझी कामगिरी चांगली व्हायची, तेव्हापासून प्रसारमाध्यमांनी मला चांगला पाठिंबा दिला आणि आज सकाळपर्यंतही त्यांचा पाठिंबा कायम आहे. प्रसारमाध्यमांच्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या कामगिरीला दाद दिल्याबद्दल त्यांचेही आभार. माझ्या २४ वर्षांच्या प्रवासातील अविस्मरणीय गोष्टी कॅमेऱ्यात कैद केलेल्या छायाचित्रकारांनाही माझ्याकडून धन्यवाद.
माझे भाषण फार लांबत चालले आहे, याची कल्पना आहे. पण शेवटची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. इथे उपस्थित असलेल्या आणि मला पाठिंबा देण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वाचाच मी आभारी आहे. मी शून्यावर बाद झालो काय किंवा शतकी खेळी साकारली काय, चाहते नेहमीच माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. मी चांगला खेळावा, म्हणून अनेकांनी माझ्यासाठी उपवास, व्रत, प्रार्थना केल्या. त्यांच्याशिवाय माझे आयुष्य असे घडले नसते. अंत:करणापासून मी साऱ्यांचे आभार मानतो. हा वेळ कसा पटकन निघून गेला. आता तुमच्याशी निगडीत सर्व आठवणी माझ्याकडे आयुष्यभर राहतील. विशेषत: ‘सचिन.. सचिन..’ हा जयघोष अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या कानात घुमत राहील. तुमचा अत्यंत आभारी आहे, जर माझ्याकडून काही सांगायचे राहून गेले किंवा बोलायचे राहून गेले असेल तर तुम्ही मला समजून घ्याल, गुड बाय!
जेव्हा महेंद्रसिंग धोनी मला दोनशेव्या सामन्याची खास टोपी देत होता, तेव्हा मी संघाला एक संदेश दिला, जो मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी सांगतो. मला वाटते की, आपण एवढे सुदैवी आहोत की, आपण भारतीय संघाचे एक भाग होऊ शकलो आणि त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा आणि देशसेवा करायला हवी. तुम्ही योग्य भावनेने आणि योग्य तत्त्वांनुसार देशाची सेवा कायम कराल, हे मला माहिती आहे. आपण सुदैवी आहोत, कारण या कामासाठी आपल्याला देवाने निवडलेले आहे. यापुढे कायम तुम्ही योग्य भावना व सर्वोत्तम क्षमतेने देशाची सेवा कराल. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा