भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडने २००७ साली संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सचिन तेंडुलकरनेच संघाच्या कर्णधार पदासाठी  महेंद्रसिंग धोनीचे नाव सुचविल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले आहे.
शरद पवार म्हणतात, “सचिन नेहमी युवा खेळाडूंना मदत करण्यास अग्रेसर असतो. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने कर्णधारपद सोडले. राहुल द्रविडनेही कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यावर प्रथम मी त्याला स्पष्ट नकार दिला होता. कारण लवकरच टी-२० मालिका सुरू होणार होती. तसेच विश्वचषक स्पर्धेसाठीही अवघ्या वर्षभराचा कालावधी राहीला होता. त्यावेळी राहुलने सचिनचे नाव कर्णधारपदासाठी योग्य असल्याचे म्हटले होते. सचिनने मात्र याला नकार देत धोनीचे नाव कर्णधारपदासाठी सुचविले. धोनी उत्तम यष्टीरक्षक आहे परुंतु, तो चांगला कर्णधार होऊ शकेल का? असे विचारल्यावर धोनी उत्कृष्ट कर्णधार होईल असे भाकित सचिनने केले होते. त्यानुसार महेंद्रसिंग धोनीला कर्णधार करण्यात आले आणि धोनीने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. याबद्दल काही वेगळे सांगायलाच नको. धोनीच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक तसेच एकदिवसीय विश्वचषकावर भारताचे नाव कोरले गेले.”

Story img Loader