फिरकीच्या रणांगणावर भारतीय संघ दारुण अपयशी ठरला. आपले दिग्गज फलंदाज इंग्लिश फिरकीसमोर धारातीर्थी पडले. यात समावेश होता तो मुंबईचा निष्णात योद्धा सचिन तेंडुलकर याचा. मॉन्टी पनेसार या इंग्लंडच्या गुणवान फिरकी गोलंदाजाने सचिनला दोन्ही डावांत तंबूची वाट दाखवली. वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर सचिनकडून मोठय़ा अपेक्षा करण्यात येत होत्या. पण ३९ वर्षीय सचिन त्या पूर्ण करण्यात अपयशी ठरला. सद्यस्थितीमधील सचिनची सातत्यपूर्ण प्रभावहीन कामगिरी पाहता आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी मंगळवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीमध्ये सचिनला वगळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सचिनने निवड समितीशी सल्लामसलत करूनच भवितव्याचा निर्णय घ्यावा, असे भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनीही सोमवारी सुचविले होते. परंतु सचिनच्या निवृत्तीचा निर्णय तो स्वत:च घेईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. हे जरी असले तरी सचिनची कामगिरी मुळीच समाधानकारक नाही. इंग्लंडविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांतील तीन डावांमध्ये सचिनला २९ धावाच काढता आल्या आहेत. याचप्रमाणे न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमधील तीन डावांमध्येही त्याने ६३ धावा केल्या आहेत. या मालिकेतील तिन्ही डावांमध्ये सचिनचा त्रिफळा उडाल्यामुळे प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या हालचाली मंदावल्या असून, आता निवृत्ती घेणे योग्य ठरेल, अशी मागणी केली होती.
ही कामगिरी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट हे बिरूद मिरविणाऱ्या फलंदाजाला मुळीच साजेशी नाही. १०० शतके झळकावणाऱ्या सचिनने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचे कसोटी शतक झळकावले. कसोटीमधील गेल्या १० डावांत त्याने फक्त १५.३च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. या आकडेवारीमुळेच सचिनला आगामी दोन सामन्यांसाठी वगळण्याची चिन्हे आहेत. याच पाश्र्वभूमीवर निवृत्ती पत्करण्यासाठी ही सचिनला धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.    

आहे ‘मास्टरब्लास्टर’ तरीही..
न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी : १९
दुसरी कसोटी : १७ व २७
इंग्लंडविरुद्ध  पहिली कसोटी : १३
दुसरी कसोटी : ८ व ८
कसोटी क्रिकेटच्या मागील १० डावांमध्ये १५.३च्या सरासरीने अवघ्या १५३ धावा
शेवटचे शतक जानेवारी २०११मध्ये

Story img Loader