फिरकीच्या रणांगणावर भारतीय संघ अपयशी ठरला. आपले दिग्गज फलंदाज इंग्लिश फिरकीसमोर धारातीर्थी पडले. यात समावेश होता तो मुंबईचा निष्णात योद्धा सचिन तेंडुलकर. मॉन्टी पनेसार या इंग्लंडच्या गुणवान फिरकी गोलंदाजाने सचिनला दोन्ही डावांत तंबूची वाट दाखवली. वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर सचिनकडून मोठय़ा अपेक्षा करण्यात येत होत्या. पण ३९ वर्षीय सचिन त्या पूर्ण करण्यात अपयशी ठरला. अहमदाबादच्या पहिल्या कसोटी सामन्यातही सचिनला पहिल्या डावात जेमतेम १३ धावा काढता आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर सचिनने आता निवृत्ती पत्करावी, ही मागणी जोर धरू लागली आहे. सचिनने निवड समितीशी सल्लामसलत करूनच भवितव्याचा निर्णय घ्यावा, असे भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनीही सोमवारी असे म्हटले होते. इंग्लंडविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी मंगळवारी निवड समितीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर सचिनच्या भवितव्याबाबत गांभीर्याने चर्चा होत आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांत सचिनला २९ धावाच काढता आल्या आहेत. या आधी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी १९ आणि दुसऱ्या कसोटीत १७ व २७ धावा काढता आल्या होत्या. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या तिन्ही डावांमध्ये सचिनचा त्रिफळा उडाल्यामुळे प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या हालचाली मंदावल्या असून, आता निवृत्ती घेणे योग्य ठरेल, अशी मागणी केली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही पनेसारने त्याचा त्रिफळा उडवला. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनने आपले अखेरचे कसोटी शतक झळकावले आहे. १०० शतके झळकावणाऱ्या सचिनला गेली दोन वष्रे शतक साकारता आलेले नाही. कसोटी क्रिकेटमधील मागील १० डावांमध्ये सचिनने फक्त १५.३च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. ही कामगिरी क्रिकेटच्या मैदानावरील अनभिषिक्त सम्राट हे बिरूद मिरविणाऱ्या फलंदाजाला मुळीच साजेशी नाही.गेल्या वर्षभरात भारतीय क्रिकेट संक्रमणातून जात आहे. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे अनुभवी, परंतु वयेशीर फलंदाज भारतीय क्रिकेट क्षितीजावरून लुप्त झाले आहेत. आता सचिननेही निवृत्ती पत्करून नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी द्यावी, असे क्रिकेटवर्तुळात म्हटले जात आहे. परंतु सचिनच्या निवृत्तीचा निर्णय तो स्वत:च घेईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
सचिनच्या निवृत्तीच्या मागणीला जोर ?
सचिनने त्याच्या भविष्यातील योजनांबाबत निवड समितीशी चर्चा करायला हवी, असं मत भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. फक्त गावसकरच नव्हे तर माजी क्रिकेटपटू आणि सचिनचा जीवलग मित्र विनोद कांबळीनेही सचिनने निवृत्ती स्वीकारावी, असं म्हटलं आहे.
First published on: 26-11-2012 at 05:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin should discuss about his retirement sunil gavaskar