निवड समितीने सचिन तेंडुलकरशी क्रिकेटमधील भवितव्याबाबत चर्चा करायली हवी असे परखड उद्गार भारताचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ फलंदाज सुनील गावस्कर यांनी काढले. मुंबई कसोटीत सचिनला दोन्ही डावात मिळून १६ धावाच करता आल्या. त्या पाश्र्वभूमीवर गावस्कर बोलत होते.
सचिन गेली अनेक वर्ष अव्याहतपणे क्रिकेट खेळत आहे आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आहे. मात्र सध्याचा त्याची कामगिरी बघता समीक्षकांना टीका करण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
‘अंतिम निर्णय निवडसमितीच घेते. माझ्या मते भविष्यातील वाटचालीविषयी निवडसमिती सचिनशी संवाद साधेल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल’, असे गावस्कर म्हणतात.  
निवृत्तीसंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सचिन स्वत:च घेईल असे गावस्कर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
या मालिकेत तीन डावात मिळून सचिनला केवळ २९ धावा करता आल्या आहेत. तो सध्या कारकीर्दीतील खराब कालखंडातून जात आहे. मात्र एवढी शतके आणि धावा नावावर असणारा सचिन यातूनही बाहेर पडेल, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला.

Story img Loader