‘‘सचिनला लहानपणापासून पाहात आलो आहे. यापुढे सचिन मैदानात दिसणार नाही, यामुळे मी थोडासा भावूक झालो आहे. सचिनने आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात शतक ठोकावे आणि हा सामनाही अविस्मरणीय करावा,’’ अशी इच्छा वानखेडेचे प्रमुख खेळपट्टी क्युरेटर आणि भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांनी व्यक्त केले.
खेळपट्टीबाबत विचारल्यावर नाईक म्हणाले की, ‘‘वानखेडेची खेळपट्टी नेहमीच ‘स्पोर्टिग’ राहिलेली आहे. प्रत्येक खास कारणांसाठी खेळपट्टी बनवताना फार मेहनत घ्यावी लागले. १९८७पासून मी वानखेडेची खेळपट्टी बनवत असून १९९६ आणि २०११च्या विश्वचषकात आम्ही फार मेहनत घेतली. या सामन्यासाठी बनवलेली खेळपट्टी पहिले तीन दिवस फलंदाजीसाठी चांगली असेल. पहिल्या तासात वेगवान गोलंदाजांना थोडी मदत होऊ शकते. कारण रात्रीचे दव पडते त्याचा काहीसा पहिल्या तासाभरात खेळपट्टीवर होत असतो, पण एकदा लख्ख सूर्यप्रकाश पडला तर मत दवाचा जास्त परिणाम होणार नाही. चौथ्या
दिवसापासून चेंडू चांगला वळायला सुरुवात होईल. त्यामुळे पहिले तीन दिवस फलंदाज, काही प्रमाणात वेगवान गोलंदाज आणि अखेरचे दोन दिवस फिरकीपटू कमाल दाखवू शकतात.’’
खेळपट्टीबाबत सचिनची विचारणा
सचिन तेंडुलकरने नेहमीप्रमाणेच सुधीर नाईक यांच्याशी वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत विचारणा केली होती. खेळपट्टी कशी असेल असे सचिनने विचारल्यावर नाईक म्हणाले, ‘‘खेळपट्टी तुझ्यासाठी आदर्शवत अशीच आहे. थोडे हिरव्या गवताचे ठिपके दिसत असतील तरी तू दडपण घेऊ नकोस. या खेळपट्टीवर चेंडू सहजपणे बॅटवर येईल. तुझा हा अखेरचा कसोटी सामना आहे, त्यामुळे तू या मैदानात मोठी खेळी साकारायला हवीस, किमान अर्धशतक तरी तू ठोकायला हवेस.’’ सचिनने नाईक यांचे म्हणणे ऐकल्यानंतर नेहमीच्या शैलीनुसार स्मितहास्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा