मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन जोपर्यंत खेळत राहील, तोपर्यंत त्याने आनंदाने जगावे, असे आचरेकर सरांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
ते म्हणाले, ‘‘माझ्या शुभेच्छा कायम सचिनच्या पाठीशी आहेत. त्याने जास्तीत जास्त धावा काढाव्यात आणि प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळत राहावे, याच माझ्या शुभेच्छा असतील. क्रिकेट हा सचिनचा श्वास आणि ध्यास आहे. त्यामुळे क्रिकेट खेळत असेपर्यंत त्याने आपले जीवन आनंदात घालवावे.’’
‘‘सचिन आपली पत्नी अंजलीसह मला भेटायला येत असतो. त्यानंतर आम्ही कित्येक तास क्रिकेटवर गप्पा मारत असतो. सचिन फलंदाजीला उतरल्यावर मी जागेवरून हलतसुद्धा नाही. आता सचिनच्या वाढदिवशी होणाऱ्या सामन्याची मला उत्सुकता आहे,’’ असेही ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारप्राप्त आचरेकर सरांनी सांगितले.

Story img Loader