न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सचिन तेंडुलकर तीनदा त्रिफळाचीत झाला आणि त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी की नाही, यावर चर्वितचर्वणाला सुरुवात झाली. सचिनेही हे गंभीरपणे घेत इंग्लंविरुद्धच्या मालिकेनंतर निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच केले. पण भारताचे माजी विश्वविजेता कर्णधार कपिलदेव यांनी ‘सचिननेच त्याच्या निवृत्तीबाबतचा निर्णय घ्यावा’, असे मत मांडले आहे.
सचिनसारख्या महान खेळाडूला निवृत्ती कधी घ्यायची हे नक्कीच माहिती असेल आणि त्यावर कोणतेही भाष्य करावे, असे मला वाटत नाही. महान खेळाडू लोकांसाठी कायम अविस्मरणीयच असतात, त्यांचा कधीच विसर पडत नाही. उदाहरण द्यायचेच झाले तर सुनील गावसकर हे उत्तम उदाहरण आहे. त्याला लोक अजूनही ओळखतात, असे कपिल म्हणाले.
राहुल द्रवीड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या दोन अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती पत्करल्यानंतर सचिननेही निवृत्ती घेणे आता योग्य ठरेल का, असा प्रश्न कपिल यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.
यानंतर आयपीएलबाबत त्यांचे मत विचारले असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Story img Loader