महेंद्रसिंग धोनी हा भारताचा एक यशस्वी कर्णधार. आयपीएलमध्येदेखील धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चांगली कामगिरी करत आहे. पण धोनीला भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळण्याआधीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्यातील कर्णधाराचे गुण ओळखले होते. एका मुलाखतीत त्याने याबाबत सांगितले आहे.
धोनीचे नेतृत्वकौशल्य नेहमीच साऱ्यांना प्रभावित करते. सचिन हा नेहमीच धोनीला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा देत असे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सचिन म्हणाला की मी ज्या वेळी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असे, त्या वेळीच मी धोनीतील कर्णधार ओळखला होता.
याबद्दल सविस्तर बोलताना तो म्हणाला की मी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचो, त्यावेळी मी धोनीशी नेहमी चर्चा करायचो. त्यावेळी मैदानावर लावलेले क्षेत्ररक्षण बरोबर आहे की त्यात सुधारणा हवी, असेही त्याला विचारत राहायचो. आम्ही कायम एकमेकांशी संवाद साधत आणि चर्चा करत असायचो. मी प्रश्न विचारल्यावर तो त्याची मतं स्पष्टपणे सांगायचा. त्याची विचार करण्याची पद्धत काहीशी वेगळीच होती. त्यावेळीच मला त्यातले कर्णधाराचे गुण दिसले, असे सचिन म्हणाला.
याच मुलाखतीत बोलताना सचिन आशिष नेहराबद्दलही बोलला. तो म्हणाला की आशिष नेहरा हा एक उत्तम मनोरंजन करणारा खेळाडू आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये आला की सगळे जण गप्प असायचे आणि तो एकटा बोलत असायचा, अशा काही आठवणी त्याने सांगितल्या.