‘पिकतं तिथं विकत नाही’, ही म्हण कालबाह्य़ ठरवायची तर ‘जे विकलं जातं, तेच पिकवावं’, अशी म्हण केली तर?.. फरक काहीच पडणार नाही. कारण  मार्केटिंगच्या फंडय़ात नेमकं हेच केलं जातं. सध्या सचिन नामाचा जो अविरत गजर सुरू आहे, तो त्याने आपली निवृत्ती पत्करावी म्हणून. सचिन आता ३९ वर्षांचा झालाय. त्याचं आता वय झालंय, त्याच्या वयाचे क्रिकेटपटू निवृत्ती पत्करून ‘क्रिकेटर्स रिटायरमेंट प्लान’ अर्थातच समालोचन करणे, लेख लिहिणे, स्तंभलेखन करणे, प्रशिक्षण अकादमी काढणे किंवा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणे; आदी उपक्रमांत स्वत:ला गुंतवून घेतात. मग सचिन मात्र खेळतोय. थोडेथोडके नव्हे २३ वष्रे खेळतोय. भारतीय क्रिकेटचं आराध्य दैवत, असं बिरूदही मिरवतोय. मग काय करावं? त्याच्या दैववादावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करावं, उत्तर इतकं सोप्पं आहे. सचिन अपयशी ठरतोय, त्याच्या पायांच्या हालचाली मंदावल्या आहेत, तर कधी त्याचा त्रिफळाच का उडतो.. यासारख्या अनेक विषयांमध्ये तमाम प्रसारमाध्यमं, माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समीक्षकांनी गेली अनेक वष्रे धन्यता मानली. गेले काही महिने तर ही भावनिकता अधिक तीव्रपणे जाणवते. सचिनच्या १००व्या शतकाचा डिंडिम याच मंडळींनी वाजविला. त्यामुळे ही महाप्रतीक्षा, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सुमारे ३३ डावांपर्यंत लांबली. म्हणजेच हे दिवस या साऱ्या मंडळींनी सचिनचे पृथक्करण करीत आपापल्या पोळ्या भाजून घेतल्या. तूर्तास एक साधा विचार करू, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि रिकी पाँटिंग यांच्याप्रमाणे विचार करून सचिनने उद्या सकाळी आपली तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली, तर प्रसारमाध्यमं ‘ब्रेकिंग न्यूज’ चालवतील. दिवसभर फार तर आठवडाभर सचिनविषयक चर्चात्मक कार्यक्रमांची गुऱ्हाळं सुरू राहातील. पण पुढे काय? नंतर या साऱ्या वाहिन्यांना टीआरपी आणि वृत्तपत्रांना त्यांचा खप वाढवू देणारा दुसरा सचिन इतक्या लवकर गवसणार आहे का? मग ही सारी मंडळी कशाचे चर्वितचर्वण करतील. सुनील गावस्कर, कपिल देव आणि विनोद कांबळी या सचिनविषयक मत मांडणाऱ्या माजी क्रिकेटपटूंनी मोठमोठय़ा वाहिन्यांवर मग कशाची चर्चा करावी. सचिन नावाचं हे दुकानच बंद पडलं, तर या साऱ्यांच्या चर्चा वगैरे ऐकणार कोण?
एक साधे उदाहरण घ्या. सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही सोमवारी अपयशी ठरला. यावर सर्वप्रथम तोंड उघडले ते सुनील गावस्करने. त्या रात्री एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात गावस्करने असे म्हटले की, ‘‘सचिनने आपल्या भवितव्याविषयी निवड समिती सदस्यांशी चर्चा करायला हवी.’’ झाले.. गावस्कर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूचे मत शिरसावंद्य मानत साऱ्या प्रसारमाध्यमांनी त्याची री ओढली. सचिनच्या मागील १५ डावांमधील अपयशाचा आलेख मांडण्यात आला. तो अजून का खेळतोय, त्याने युवा क्रिकेटपटूंना जागा करून द्यायला हवी, असे मुद्दे या मंडळींनी मोठय़ा दिमाखात उपस्थित केले. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सचिनचा तिन्ही डावांमध्ये त्रिफळा उडाल्यानंतर गावस्करने सचिनच्या पायाच्या हालचाली मंदावल्या आहेत, अशी समीक्षा केली होती. पण काही दिवसांपूर्वी सचिनने रणजीमध्ये शतक झळकावल्यावर हेच गावस्कर महाराज फार समाधानी होते. ‘‘सचिनकडून धावा होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तो पुन्हा समर्थपणे आपली कामगिरी दाखवेल,’’ असा विश्वास गावस्कर यांनी प्रकट केला होता. पण वानखेडेवरील अपयशाचे सावज निसटता कामा नये, हे वृत्तवाहिनीने चांगलेच जाणले. त्यामुळे सचिननं निवड समितीशी सल्लामसलत करण्याचे गावस्कर यांनी उद्गार काढले. दुसऱ्या दिवशी विनोद कांबळी आणि भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनीही आपली तोंडे उघडली. सचिनने निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असा सल्ला कांबळीनं दिला. तसंच कपिलनं गावस्करांच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. मग निवड समितीची आणि सचिनची चर्चा झाली की नाही, सचिनला निवड समिती उर्वरित कसोटी सामन्यांत घेणार का, हे विषयही प्रसारमाध्यमांना हवेच होते. गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान रिकी पाँटिंगने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. पुन्हा त्याचा संबंध सचिनपर्यंत जोडला गेला. पाँटिंगला जे जमलं, ते सचिनला का नाही?.. हे नवं खतपाणी मिळालं. मोठे क्रिकेटपटू वा समीक्षक दिमतीला नसलेल्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी तोच माल चांगल्या रॅपरमध्ये पॅक करून दुप्पट किंमतीला विकला. सचिन नामाचं हे दुकान अशा प्रकारे चालू आहे.
फक्त सचिन या विषयाला वाहिलेली अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत आणि त्याच्याविषयीचे कार्यक्रमही निरंतर होत असतात. सचिनची शाळा, त्याचे बालपण, साहित्य सहवासमधील दिवस किंवा त्याच्यासोबत एखाद-दुसऱ्या सामन्यानिमित्त का होईना ड्रेसिंग रूम ‘शेअर’ करायला मिळालेली मंडळी आता ‘मी पाहिलेला सचिन’ या बळावर स्वत: मोठे होत आहेत. सचिन नावाच्या ब्रँडचा त्यांनी गेली २३ वष्रे वापर केला आहे. त्यामुळेच सचिन खरोखर निवृत्त झाला, तर या मंडळींची पोटं कशी भरणार?
सचिननं निवृत्त व्हावं का, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे जसं बीसीसीआयनं त्याच्यावरच सोडलं आहे. तसंच प्रत्यक्षात किती टक्के क्रिकेटरसिकांना सचिन निवृत्त झालेला पाहायचा आहे, या विषयावर ‘आजचा सवाल’ उपस्थित केल्यास त्यानं निवृत्त होऊ नये, हेच मत अधिक जण प्रकट करतील. वानखेडेवर रणजी सामना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचा आकडा ५०च्या पुढे जात नाही. काही दिवसांपूर्वी सचिन रणजी खेळला, तेव्हा सुमारे सहाशे क्रिकेटचाहते हजर होते. सचिन नसलेला सामना पाहायला खरंच क्रिकेटरसिक फिरकतील?
सचिन हा जागतिक क्रिकेटमधील अजरामर विक्रमादित्य. पण काही महत्त्वाचे टप्पे त्याच्या दृष्टीपथात आहेत. सध्या १९२ कसोटी सामने खात्यावर असणाऱ्या सचिनला २०० कसोटी सामने खेळायचे असतील, ४६३ एकदिवसीय सामने खेळल्यानंतर पाचशेचा आकडा गाठायचा असेल, १८४२६ एकदिवसीय धावा झाल्यानंतर २० हजार धावांचा टप्पा गाठायचा असेल, २०१५मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेपर्यंत खेळायचे असेल किंवा क्रिकेट कारकिर्दीचा रौप्यमहोत्सव साजरा करून मग निवृत्त व्हायचे असेल.. तर या महानायकाला आपण ती संधी नाकारावी का?
सचिनची ब्रँड व्हॅल्यू फार मोठी आहे. तो बांधील असलेल्या वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपने जगभरातल्या १७ प्रख्यात उत्पादकांच्या जाहिरातींसाठी सचिनला २०१४पर्यंत करारबद्ध केले आहे. याद्वारे सचिनच्या तिजोरीत ४० कोटी रुपयांची माया जमा होते. या साऱ्या मंडळींना सचिन खेळत राहिलेला हवा आहे. ‘सचिनची निवृत्ती’ हा माल खपविणाऱ्या साऱ्या मंडळींनाही त्यामुळेच सचिन खेळत राहणे हे गरजेचे आहे. कारण सचिन खरंच निवृत्त झाला तर मग खपवणार काय? कारण वयाच्या १७व्या वर्षीपासून बाजारपेठेत चालणारे दुसरं रसायन अजून तयार झालेलं नाही. त्यामुळे ही सारी दुकानच ओस पडतील!..