*  मुंबईच्या माजी रणजीपटू आणि कसोटीपटूंनाही निमंत्रण
*  तिकिटाच्या दोन्ही बाजूंना सचिनचे छायाचित्र!
कांदिवलीमधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्लबला ‘सचिन तेंडुलकर जिमखाना’ असे नाव देण्यात येणार असून, या वेळी सचिनला एमसीएकडून खास सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. याचप्रमाणे सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या तिकिटावर दोन्ही बाजूंना त्याचे छायाचित्र असेल, असे पवार यांनी सांगितले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १४ ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यानिशी सचिन आपल्या कसोटी कारकिर्दीला अलविदा करणार आहे.
एमसीएच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर मंगळवारी प्रथमच घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी सचिनच्या सन्मानासंदर्भातील योजना प्रकट केल्या. ‘‘कांदिवलीच्या महावीरनगर येथील एमसीएच्या नव्याकोऱ्या क्लबचे ‘सचिन तेंडुलकर जिमखाना’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या वास्तूत सचिनच्या कारकिर्दीतील अनेक क्षणांची छायाचित्रेही उपलब्ध आहेत. हा कार्यक्रम ११ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता होणार असून, बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. श्रीनिवासन यांनी या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारले आहे,’’ असे पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ या कार्यक्रमाला विमानतळाहून थेट हजर राहणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महापौर सुनील प्रभू, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आदी मान्यवर मंडळी हजेरी लावणार आहेत. याचप्रमाणे मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे रणजीपटू आणि कसोटीपटूसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.’’
‘‘वानखेडे स्टेडियमवरील अत्याधुनिक पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असून, हा कार्यक्रम १३ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती या वेळी पवार यांनी दिली.
एमसीएच्या निवडणुकीप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात पवार म्हणाले की, ‘‘मी याचा फारसा विचार करीत नाही. टीका करणाऱ्याचे देशाच्या किंवा स्थानिक क्रिकेटमध्ये काही स्थान आहे का, हे प्रथम पाहावे.’’

सचिनच्या सामन्यासाठी खास
* नागपूरमधील गायत्री प्रकाशन संस्थेतर्फे सचिनच्या सर्व सामन्यांच्या आकडेवारीचा वेध घेणारे १५०-१६० पानांचे पुस्तक तयार करण्याचा प्रस्ताव आला आहे. या पुस्तकात मान्यवर क्रिकेटपटूंच्या विश्लेषणाचाही समावेश असेल. हे पुस्तक या सामन्याला हजेरी लावणाऱ्या सर्व क्रिकेटरसिकांना मोफत देण्याबाबतही प्रस्तावित आहे.
* एमसीएकडून एक सचिनसंदर्भात एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून, यात सदस्यांचे लेख आदी गोष्टींचा अंतर्भाव असेल.
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) या कसोटी सामन्याच्या दहा मिनिटे आधी सचिनला सन्मानित करण्यात येणार आहे.

Story img Loader