सचिन तेंडुलकर हे अद्भुत रसायन आहे. एखादा खेळाडू सलग २४ वर्षे अविरत परिश्रमांसह त्याच जिद्दीने, महत्त्वाकांक्षेने खेळू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. परंतु सचिनने हे शिवधनुष्य पेलले आहे. अनेक खेळाडू प्रतिभावान असतात, मात्र त्यांना त्यांच्या क्षमतेला न्याय देता येत नाही. खेळाडू आणि माणूस म्हणून अनेक अडथळे येतात, संघर्षांचे क्षण येतात, प्रलोभने मोहात अडकवू शकतात. सचिनच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे क्षण अनेकदा आले असतील, पण तो स्थितप्रज्ञ राहिला. सध्या क्रिकेटविश्वाला अनेक गैरप्रकारांनी ग्रासले आहे. सचिनच्या काळातही मॅच-फिक्सिंग आणि अन्य प्रकार घडले, मात्र त्याचे चारित्र्य निष्कलंक होते. अब्जावधी चाहत्यांच्या अपेक्षा डोक्यावर असताना सतत चांगले खेळत राहणे अतिशय कठीण आहे. पण सचिनने खेळाडू आणि माणूस म्हणून चाहत्यांचा विश्वास कमावला, तो त्याच्या सद्वर्तनाच्या जोरावर. खेळभावनेला बट्टा लागेल असे वर्तन त्याच्या हातून कधीही घडलेले नाही. युवा खेळाडूंना यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. छोटय़ा, साध्यासुध्या गोष्टींसाठी शिस्तभंग करणाऱ्या बेताल खेळाडूंसाठी सचिन एक आदर्श आहे.
माझ्यासाठीही सचिन एक आदर्श आहे. नेमबाजी हा खेळ एकाग्रतेसाठी ओळखला जातो. खेळताना डोक्यात विचार गर्दी करतात, लक्ष विचलित करतात. त्या वेळी सचिनचे बोलणे, त्याने केलेल्या खेळी आठवतो. नेमबाजी करताना लक्ष किंचित विचलित झाले तरी सारे बिघडू शकते. परंतु अशा वेळी सचिनचा गुरुमंत्र कामी येतो. संघ अडचणीत असताना मातब्बर प्रतिस्पर्धी गोलंदाज समोर असताना, प्रतिकूल परिस्थितीत त्याने जिगरबाज खेळी केल्या आहेत. या खेळी प्रचंड प्रेरणादायी आहेत. खेळ भलेही वेगळा असेल, पण सर्वोत्तमतेचा ध्यास घेण्याची वृत्ती आमच्यासारख्या खेळाडूंना मार्गदर्शक आहे.
सचिन एक महान क्रिकेटपटू आहे, यापेक्षाही माणूस म्हणून एक विद्यापीठ आहे. मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात तो वाढला. घरच्यांचे संस्कार त्याने आजही जपले आहेत. प्रसिद्धी, पैसा, नाव हे सर्व कमावूनही त्याच्या बोलण्यात कधीही गर्व नसतो. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या माणसांशी जोडलेला स्नेह आजही कायम आहे. समोरच्याला आदर देण्याची त्याची वृत्ती विलक्षण आहे. खेळाच्या मैदानावर त्याने असंख्य पराक्रम केलेत, पण यापेक्षाही त्याने जोडलेली माणसे, त्यांचा मिळवलेला विश्वास व प्रेम अधिक महत्त्वाचे आहे.
अगदी लहान असल्यापासून क्रिकेट हेच त्याचे सर्वस्व आहे. या खेळासाठी त्याने मोठा त्याग केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक पाहता त्याला घरच्यांसाठी, मित्रपरिवारासाठी वेळ देता आला नसेल. घरच्यांपासून महिनोंमहिने तो लांब राहिला आहे. निवृत्तीनंतर त्याला स्वत:ला वेळ देता येऊ शकतो, कुटुंबीयांसमवेत तो वेळ व्यतीत करू शकतो. खासदार म्हणून त्याने नव्या डावाला सुरुवात केली आहे. माझ्या मते सचिनपेक्षा अन्य कुणी क्रीडापटूंच्या समस्या, दु:ख, गरजा समजून घेऊ शकत नाही. कारण शालेय स्तरापासून स्वत: सिद्ध करत आंतरराष्ट्रीय शिखर गाठले आहे. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांची त्याला जाण आहे, त्यामुळे सचिनच्या पुढाकाराने अन्य खेळांच्या विकासाला निश्चित चालना मिळू शकते. वर्षांनुवर्षे क्रीडा संघटनांतील खुर्ची अडवून बसलेल्या आणि खेळाशी संबंध नसलेल्या व्यक्तींपेक्षा सचिनसारख्या महान क्रीडापटूकडे धुरा दिल्यास बाकी खेळांचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते.

Story img Loader