सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी आपण खूप कष्ट करतो, मात्र त्याला नशिबाची थोडी साथ पाहिजे असते आणि त्याकरिता आपण परमेश्वराचीच प्रार्थना करतो. केवळ माझ्यासाठी नव्हे तर अनेक खेळाडूंसाठी सचिन तेंडुलकर हा परमेश्वरच आहे. त्याचे नाव आठवले की आपोआपच आपल्याला प्रेरणा मिळते.
तसा माझा क्रिकेटशी काडीमात्र संबंध नाही, कारण लहानपणापासून मी आखाडय़ातच वाढलो. कुस्तीत ऑलिम्पिक पदक मिळवायचे आहे अशीच खूणगाठ बांधून मी लहानाचा मोठा झालो. माझे गुरू सतपाल हे माझ्यासाठी आदर्श असले तरी क्रीडा क्षेत्रात प्रेरणास्रोत म्हणून मी सचिनलाच अप्रत्यक्ष गुरू मानला आहे. कोणत्याही खेळांत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी, निष्ठा, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या गोष्टींची आवश्यकता असते. हे सारे गुण मी सचिनचा आदर्श ठेवीत आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. वैयक्तिक खेळांत कितीही संकटे आली किंवा अडचणी आल्या तरी संयमाने व धैर्याने सामोरे गेले की या अडचणींवर सहज मात करता येते हे मी सचिनकडून शिकलो आहे.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक मिळविल्यानंतर मी भारतात परतल्यावर एक दिवस मला सचिनचा दूरध्वनी आला. सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही. कोणीतरी चेष्टामस्करी करीत असेल असेच मला वाटले. तथापि, सचिन याने मी खरोखरीच सचिन असल्याचे सांगितल्यानंतर मला खूप आनंद झाला. त्याने माझे अभिनंदन करतानादेखील कौतुकाचे जे दोन-तीन शब्द सांगितले, ते माझ्यासाठी लंडन ऑलिम्पिकच्या रौप्यपदकाच्या दृष्टीने प्रेरणादायीच होते. त्यानंतर आमची चांगली दोस्ती झाली आहे. तीन-चार वेळा आम्ही समारंभात भेटलो आहे. लंडन ऑलिम्पिकपूर्वीही त्याने मला शुभेच्छा दिल्या होत्या. त्या शुभेच्छा माझ्यासाठी खूपच महत्त्वाच्या होत्या.
क्रिकेटमुळे अन्य खेळांचे नुकसान झाले आहे असे म्हटले जाते, मात्र ते मला मान्य नाही. सचिनसारख्या खेळाडूंनी केवळ आपल्या देशाचा नावलौकिक वाढविला आहे, एवढेच नव्हे तर या खेळाचीही प्रतिष्ठा उंचावली आहे. अन्य खेळांच्या संघटकांनीही सचिनपासून पुष्कळ काही शिकले पाहिजे. अन्य खेळांमधील खेळाडूंनाही सचिनसारख्या महान खेळाडूंचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सर्वोच्च यश सातत्याने कसे मिळवायचे हे सचिनपासून शिकले पाहिजे.
सचिन आता क्रिकेटमधून निवृत्त होत आहे ही खरोखरीच आश्चर्याची गोष्ट आहे. अजूनही अनेक विक्रम मोडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याने अजूनही खेळत राहावे असेच मला वाटते. त्याच्या खेळात पूर्वीइतकीच नजाकत अजूनही आहे. सहसा क्रिकेट मला पाहायला आवडत नाही. केवळ सचिन खेळत आहे म्हणून मी क्रिकेटच्या काही सामन्यांना गेलो आहे. आत्मविश्वासाने चेंडू सीमापार करण्याची त्याची शैली अतुलनीय आहे. क्षेत्ररक्षण करतानाही युवा खेळाडूंना लाजवील अशीच चपळाई त्याच्याकडे दिसून येते. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण तो करीत असला की प्रेक्षकांचाही आनंद गगनात मावत नसतो हे मी अनेक वेळा अनुभवले आहे. अर्थात स्पर्धात्मक खेळांतून निवृत्त होण्याचा निर्णय योग्य आहे. कीर्तीच्या शिखरावर असताना निवृत्त होणे हे केव्हाही स्वागतार्ह असते. स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतर नवोदित खेळाडूंना घडविण्याचे कार्य त्याच्या हातून घडणार आहे, याची मला खात्री आहे. त्याच्या नव्या खेळीकरिता माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत.
(शब्दांकन : मिलिंद ढमढेरे)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा