नव्वदीत जन्मलेल्या प्रत्येकासाठी सचिन तेंडुलकर हा फक्त एक क्रिकेटपटू नव्हता. सचिन एक आशास्थान होतं. सचिन एक अनुभव होता. ज्याच्याकडे पाहून प्रेरणादायी वाटावं असा ऊर्जेचा झरा होता. जागतिकीकरणाने अर्थव्यवस्था खुली झाली, पैशाचा ओघ सुरू झाला. बक्कळ पैसा मिळूनही मूल्यं जपणारा सचिन म्हणून आपला वाटायचा. आपल्या इच्छा-आकांक्षा-स्वप्नं सचिनच्या खांद्यावर द्यावीत आणि बिनघोर व्हावं इतका तो घरातला झाला होता. सचिनने क्रिकेट पाहण्याला अर्थ दिला. सण क्रिकेटचा असे पण उत्सवमूर्ती सचिन असे. सचिनसाठी पहाटे गजर लावून मॅच पाहायला उठावं वाटायचं. सचिनसाठी रात्री जागून मॅच पाहावी वाटायची. सचिनने सर्वोत्तमाचा ध्यास दिला. एखादी गोष्ट देशासाठी करायची असेल तर जीव पणाला लावून करायची हे बिंबवलं. मन इतकं कणखर करायचं की शारीरिक वेदनांच्या पल्याड जाता यायला हवं ही शिकवण सचिनने दिली. जिंकण्यासाठी खेळायचं पण प्रतिस्पर्ध्यांचा आदरही करायचा हे सचिनने दाखवलं. वैयक्तिक यशोशिखरापेक्षा संघाचं यश हे प्राधान्य असायला हवं हे सचिनने ठसवलं. चांगल्या क्रिकेटपटूइतकंच चांगला माणूस होणं अत्यावश्यक हे सचिनने कृतीतून सिद्ध केलं. विक्रमांचे इमले रचल्यानंतरही सचिनचे पाय जमिनीवरच राहिले.
मुंबईपासून १५०० किलोमीटर दूर दिल्लीतल्या पश्चिम दिल्लीत राहणाऱ्या त्या मुलासाठीही क्रिकेट म्हणजे सचिन हीच व्याख्या होती. घरातल्या छोट्या टीव्हीवर मॅच पाहायची म्हणजे सचिनने मांडलेल्या धावमैफलीचा आस्वाद लुटणे हेच त्या मुलाचं आन्हिक असे. घराजवळच्या मैदानात खेळताना सचिनने कसा फटका मारला याच्यात गप्पा होत. त्यालाही क्रिकेट आवडू लागलं होतं. त्याने खेळायला सुरुवाच केली. खात्यापित्या घरचा असल्याने गोबरे गोबरे गाल ही त्याची ओळख होती. त्या मुलाची कणखरता जगासमोर पहिल्यांदा आली जेव्हा रणजीची मॅच सुरू असताना त्याचे वडील गेले. कर्तेपणाची झूल परिस्थितीने अंगावर टाकण्याआधीच्या वयात त्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. बाबांमुळेच त्याला क्रिकेट खेळता येत होतं. तोच आधारवड निखळला होता. वडिलांना अंतिन निरोप देऊन तो मुलगा दुसऱ्या दिवशी खेळायला मैदानात उतरला. त्याच्या संघातले काय प्रतिस्पर्धी संघातले खेळाडूही अवाक झाले. मी खेळावं ही बाबांची इच्छा होती. ती मी पूर्ण करतोय असं त्या मुलाने सांगितलं. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने मॅच संपल्यावर त्याला घट्ट मिठी मारली. हे रसायन वेगळं आहे याची जाणीव तिथेच झाली. तो मुलगा होता विराट कोहली. विराटच्या नेतृत्वात भारताने U19 वर्ल्डकप जिंकला. लगोलग त्याची आय़पीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी निवड झाली. पुढच्या चार वर्षात त्याच्या क्रिकेटइतकीच त्याच्या काहीशा उर्मट वागण्याची, पार्ट्यांची, संगतीची चर्चा होऊ लागली. मुलाकडे नैपुण्य आहे पण तो बहकणार असं बोललं जाऊ लागलं.
आयपीएलच्या एका हंगामादरम्यान त्याने आरशात स्वत:ला पाहिलं. त्याला खजील वाटलं. त्याने बदलायचं ठरवलं. तिथपासून विराट जो बदलला तो कायमचा. त्याची धावांची भूक ड्रॅगनएवढी झाली. तासनतास जिममध्ये घाम गाळून त्याने शरीर कमावलं. धाव घेण्यासाठी तो आजही जीव काढून पळतो. चौकार-षटकारांइतक्याच एकेरी-दुहेरी धाव काढू शकतो कारण शरीर फिट आहे. एखादी धाव वाचवण्यासाठी तो जीवाचा आटापिटा करतो. एखादा झेल टिपण्यासाठी स्वत:ला झोकून देतो. हे करु शकतो कारण उच्च दर्जाचा फिटनेस. त्याला खेळण्याची दैवी देणगी लाभली नव्हती. तो चुका कमी करत गेला. प्रत्येक सामन्यात चूक सुधारलेली दिसे. होबार्टमधल्या त्या मॅचनंतर त्याला पाठलागाचं गणित कळलं. त्यानंतर धावांचा पाठलाग आणि विराटचं शतक हे समानार्थी शब्द झाले. समोरच्या संघाने उभारलेला धावांचा डोंगर पेलण्यासाठी कशी खेळी करायची याचा वस्तुपाठ विराट झाला. कुठल्या गोलंदाजाला आदर द्यायचा, कोणाचा पालापाचोळा करायचा, कुठल्या दिशेला बाऊंड्री जवळ आहे, कुठे लांब आहे, मोठे फटके येत नसतील तर दोनच्या जागी तीन पळायच्या, कधी वेग वाढवायचा, कधी स्लो व्हायचं याचं एक प्रारुपच विराटने तयार केलं. आपण काय खातोय याबाबत तो अतिशय जागृत झाला.
आयुष्यात अनुष्का आल्यानंतर तो अधिक एकाग्र आणि शांत झाला. तादात्म्य पावणे हे एक अध्यात्मिक स्वरुप आहे. धावांच्या राशी ओतणारा विराट हे एक रोबोटिक तादात्म्य आहे. तो खेळत जातो, समोरचे हरत जातात. वैमानिक काहीवेळेस ऑटो पायलट मोडमध्ये जातात. मॅच विराट मोडमध्ये जाते. त्याची धावांची भूक भागतच नाही. तो थकतही नाही. घामाने त्याची जर्सी ओलीचिंब होते. उष्णता आणि आर्द्रता जीव काढतात पण तो हटत नाही. तो कधीच कॅज्युअल नसतो. चुकून झालाच तर पुढच्या डावात त्याचं उट्टं काढतो. कॉर्पॉरेट भाषेत इंटेट हा शब्द महत्त्वाचा मानला जातो. इंटेटचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर विराटला मैदानात पाहावं. यॉर्कर टाका, बाऊन्सर टाका, फिरकीचं जाळं विणा- तो धावा करत जातो. तो विकेट टाकत नाही. तुम्हाला जिंकायचं असेल तर माझा अडथळा पार करावा लागेल असं त्याचं थेट गणित असतं. २००९ साली त्याने पहिल्यांदा वनडेत शतक झळकावलं. त्या सामन्यात गौतम गंभीरनेही शतक झळकावलं. गंभीरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला- पहिलं शतक हे अनोखं असतं. विराटने आज अप्रतिम खेळी केली. हे त्याचं पहिलंच शतक आहे. यापुढेही तो अशीच शतकं झळकावेल. मी माझा पुरस्कार त्याला देऊ इच्छितो. असं म्हणून गंभीरने विराटला बोलावलं आणि चेक सुपुर्द केला. तेव्हापासून विराटचा शतकी रतीब सुरूच आहे.
असं म्हणतात की शतक हा वैयक्तिक मापदंड आहे. जोवर शतकाच्या माथी विजयाचा टिळा नसेल तर त्याचं महत्त्व उणं होतं. विराटच्या बाबतीत हीच गोष्ट त्याला महान ठरवते. त्याच्या बहुतांश शतकांनी संघाच्या विजयाचा पाया रचला गेला आहे. २०११ वर्ल्डकपनंतर विराट म्हणाला होता, इतकी वर्ष सचिनने अब्जावधी देशवासीयांच्या आशाअपेक्षांचं ओझं वागवलं. आज आम्ही त्याला उचलून घेतलं आहे. बरोबर एका तपानंतर विराट स्वत:च एक दंतकथा झाला आहे. रविवारी त्याने त्याच्याच आदर्शाच्या विक्रमाला हात लावला. कळसूबाई सर करणाऱ्या कार्यकर्त्याला माऊंट एव्हरेस्टला पोहोचल्यावर कसं वाटत असेल ते आज कोहलीला वाटत असेल. पण यानंतर तो जे बोलला ते महत्त्वाचं- लोकांना तुलना करायला आवडतं पण माझी कधीच सचिनशी तुलना करु नका. तो दिग्गज आहे. फलंदाजीतलं परफेक्शन म्हणजे सचिन आहे. त्याला पाहत मी मोठा झालो. त्याच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली. आज त्याच्या विक्रमाची बरोबरी केली. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा सन्मान आहे. माझ्यासाठी हा भावुक करणारा क्षण आहे.
सचिनने बालपणीचा काळ सुंदर केला. विराटने कर्तेपण अंगावर पडून चाकरमानी होण्याचा टप्पा आनंददायी केला. सर्वसामान्य माणूस समस्यांनी वेढलेला असतो. या दोघांनी तो वेढा सातत्याने सोडवला. त्यांचं काम बोलत राहिलं त्यामुळे आपल्याला जगायला बळ मिळत गेलं. सचिन आणि नंतर विराट हे पिढीगत स्थित्यंतर अनुभवता आलं हेच आपलं भाग्य….