Sachin Tendulkar Q&A: सचिन तेंडुलकरच्या लेकाने म्हणजेच अर्जुन तेंडुलकरने अवघ्या एका विकेटमध्ये सर्व क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने दोन षटकात १८ धावा दिल्या. तर मंगळवारी झालेल्या सनरायझर्स विरोधात झालेल्या सामन्यात अर्जुनने २.५ षटकात १८ धावा देत एक विकेट घेतली. अर्जुनने भुवनेश्वर कुमारला बाद केल्यावर सचिनसह त्याच्या चाहत्यांनी सुद्धा तेंडुलकरच्या लेकाचं खुप कौतुक केलं होतं. पण खरं पाहायला गेलं तर भुवनेश्वर कुमार तर अर्जुनची २०२३ मधली पहिली विकेट आहे यापूर्वी एकदा त्याने वडिलांची म्हणजेच चक्क सचिनची सुद्धा विकेट घेतली आहे.
सचिनने आज ट्विटरवर #AskSachin अंतर्गत चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. एका फॅनने सचिनला विचारले होते की, अर्जुनने कधी तुला आउट केले आहे का? यावर सचिनने लॉर्ड्समधील एका आठवणीचा संदर्भ देत हो असे उत्तर दिले पण या गोष्टीची अर्जुनला आठवण करून देऊ नका असेही सचिन म्हणाला आहे. कदाचित यामुळे अर्जुन हुरळून जाऊ नये असा त्याचा हेतू असावा असे अंदाज सचिनच्या फॅन्सनी बांधले आहेत.
याच सेशनमध्ये अर्जुनविषयीच्या अनेक प्रश्नांचा सचिनवर वर्षाव केला होता. अर्जुनने जेव्हा पहिल्यांदा सचिनला आपण क्रिकेट खेळणार असल्याचे सांगितले तेव्हा त्याने काय प्रतिक्रिया दिली हे सुद्धा सांगितले आहे. यातील एका प्रश्नावर उत्तर देताना सचिनने मी, रोहित शर्मा व अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या वतीने एकाच सामन्यात खेळावं अशी इच्छा सुद्धा व्यक्त करून दाखवली.