Sachin Tendulkar On Virat Kohli’s Future: विराट कोहलीचे विश्वचषक विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न नुकत्याच संपलेल्या २०२३ च्या हंगामात अपूर्ण राहिले असले तरी किंग कोहलीने जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. भारताच्या माजी कर्णधाराने क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अनेक रेकॉर्ड्स तोडले. कोहलीने टूर्नामेंटचा शेवट तब्बल ७६५ धावांसह केला, आणि अशा प्रकारे विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने ६०३ धावा केल्या होत्या. याशिवाय तेंडुलकरच्या ४९ शतकांचा विक्रम सुद्धा कोहलीने आपल्या नावे केला. यानंतर सचिन तेंडुलकरने सुद्धा आपल्या जुन्या सहकाऱ्याचं मनसोक्त कौतुक केलं. सचिनने आता एका मुलाखतीत बोलताना विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भविष्याविषयी भाष्य केलं आहे.
तेंडुलकरने ESPNCricinfo सह बोलताना म्हणाला की, “विराटला भारताकडून खेळण्याआधीही मी पाहिले आहे. मी त्याला मोठं होताना पाहिले आहे, आणि मग तोच खेळाडू देशासाठी अशा अद्भुत गोष्टी साध्य करतो हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. आणि मला खात्री आहे त्याचा प्रवास थांबला नाहीये. त्याच्या मनात अजून बरंच क्रिकेट (प्रेम) शिल्लक आहे आणि त्याने अजून खूप धावा करणं शिल्लक आहे. धावांची भूक आणि देशासाठी आणखी काही साध्य करण्याची इच्छा त्याच्यात कायम टिकून राहावी. हा विक्रम भारताकडेच कायम आहे याचा मला आनंद आहे. धावांचा विक्रम भारताचा आहे असे मी नेहमी म्हणत आलो आहे आणि अजूनही तेच म्हणेन.”
हे ही वाचा<< “त्या लोकांची दूरदृष्टी..”, सुनील गावसकरांची ‘सचिन’साठी खास पोस्ट; तेंडुलकरची ‘कमेंट’ गुगली ठरली लक्षवेधी
दरम्यान, तेंडुलकरने विश्वचषकाच्या वेळी सुद्धा विराट कोहलीची एक खास आठवण शेअर करत त्याचे अभिनंदन केले होते. कोहली जेव्हा पहिल्यांदा ड्रेसिंग रूममध्ये आला होता तेव्हा बाकीच्या खेळाडूंनी गमतीत त्याला माझा आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडायला सांगितले होते. विराट बरोबर मी ड्रेसिंग रूम शेअर केली आहे आणि त्याची नवी प्रगती अभिमानास्पद आहे असेही तेंडुलकरने म्हटले होते.
दुसरीकडे, विराट कोहली १० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे समजत आहे. विराट कोहलीने बीसीसीआयला याबाबत कळवले असल्याचे वृत्त इंडियन एक्सस्प्रेसने दिले आहे.