मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटपटू म्हणून पहिली ओळख मिळाली ती शालेय क्रिकेटमधून. दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतून खेळताना त्याच्या हॅरिस शिल्डमधील विश्वविक्रमाची सर्वप्रथम क्रिकेटजगताने दखल घेतली होती. सचिनने आपला शाळकरी सहकारी विनोद कांबळीच्या साथीने केलेल्या त्या विक्रमाला २५ वष्रे लोटली असताना आता सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे. परंतु मुंबई शालेय क्रीडा संघटनेने (एमएसएसए) सचिनला हॅरिस आणि गाइल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्याची विनंती केली जाणार आहे. सध्या सचिनच्या मुंबई इंडियन्स संघानेच एमएसएसएला पुरस्कृत केले असल्यामुळे मुंबई इंडियन्स चषक नावानेच विविध शालेय स्पर्धा होत आहेत. त्यामुळे सचिनला ही विनंती मान्य करण्यात फारशी अडचण येणार नाही, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
मुंबई शालेय क्रीडा संघटनेची स्थापना १८९३साली झाली. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास या संघटनेच्या पाठीशी आहे. याचप्रमाणे हॅरिस शिल्ड (१६ वर्षांखालील) आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेला १८९६मध्ये तर गाइल्स शिल्ड (१४ वर्षांखालील) आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेला प्रारंभ झाला. शंभरहून अधिक वष्रे हॅरिस आणि गाइल्स शिल्ड स्पर्धा शालेय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना घडवत आहे. १९८८मध्ये शालेय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावाचा दबदबा होता. त्याने हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेत आपला परममित्र विनोद कांबळीसोबत नाबाद ६६४ धावांची ऐतिहासिक भागीदारी साकारली. या विक्रमाप्रसंगी सचिनने नाबाद ३२६ तर विनोदने नाबाद ३४९ धावा केल्या होत्या. याच दिवसांत सचिनला चक्क सुनील गावस्कर यांनी पॅडची जोडी भेट म्हणून दिली होती. तीच परिधान करून सचिनने पाकिस्तानविरुद्ध १९८९मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
‘‘मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या कार्यात सचिन सामील व्हावा, अशी आमची इच्छा आहे. तळागाळातील मुलांपर्यंत त्यामुळे क्रिकेट पाहोचू शकेल. १९८०च्या दशकात सचिनला शालेय क्रिकेटमुळेच चर्चेत आणले. या पाश्र्वभूमीवर हॅरिस आणि गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पध्रेचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होण्याची आम्ही सचिनला विनंती केली आहे. सचिनमुळे स्पध्रेला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल,’’ असे मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे अध्यक्ष फादर ज्यूड रॉड्रिगस यांनी सांगितले.
तथापि़, एमएसएसएचे प्रशासकीय संचालक सॅव्हिओ अब्राहम म्हणाले की, ‘‘सचिन हॅरिस आणि गाइल्स शिल्ड स्पध्रेचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला तर शालेय खेळाडूंना आपला खेळ उंचावण्यासाठी मदत होऊ शकेल. सचिनसारखा मोठा खेळाडू होण्याची मुलांना प्रेरणा मिळू शकेल. सोमवारी सचिनला एमएसएसएकडून याबाबतचे अधिकृत विनंती पत्र देण्यात येणार आहे.’’
हॅरिस आणि गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचा सचिन ब्रँड अॅम्बेसेडर?
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटपटू म्हणून पहिली ओळख मिळाली ती शालेय क्रिकेटमधून.
![हॅरिस आणि गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचा सचिन ब्रँड अॅम्बेसेडर?](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/10/k0241.jpg?w=1024)
First published on: 13-10-2013 at 05:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar brand ambassador of haris and gails cricket competition