IML 2024 starts from November 17 : बहुप्रतिक्षित इंटरनॅशनल मास्टर्स लीग (आयएमएल २०२४) संपूर्ण जगाला तुफान घेरण्यासाठी सज्ज आहे. या लीगमधील संघांची नावे आणि त्यांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ सहभागी होणार आहेत. या संघांमध्ये सचिन तेंडुलकर भारताचे नेतृत्व करणार आहे, तर ब्रायन लारा वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करणार आहे. या लीगचा पहिला हंगाम १७ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होईल आणि ८ डिसेंबर २०२४ पर्यंत चालेल.
कोणकोण आहेत सहा संघाचे कर्णधार –
या लीगच्या पहिल्या सत्रात सुरुवातीला नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर ४ सामने आयोजित केले जातील. या लीगचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात १७ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा आमनेसामने असतील. दुसऱ्या सामन्यात शेन वॉटसनच्या ऑस्ट्रेलियाचा सामना जॅक कॅलिसच्या दक्षिण आफ्रिकेशी होईल आणि त्यानंतर श्रीलंकेचा सामना आयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडशी होईल. त्यानंतर ब्रायन लारा आणि त्याचा वेस्ट इंडिज संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरेल.
नवी मुंबईतील ४ सामने पूर्ण झाल्यानंतर, लीगच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने २१ नोव्हेंबरपासून लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवले जातील. २१ नोव्हेंबरला लखनौमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. लखनौमध्ये एकूण ६ सामने खेळवले जातील. त्यानंतर लीगचा तिसरा टप्पा रायपूरमध्ये खेळवला जाईल. या लीगचे ८ सामने रायपूरमध्ये आयोजित केले जातील, ज्यात उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा समावेश आहे. ८ डिसेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
हेही वाचा – Arundhati Reddy : टीम इंडियाला मोठा धक्का! आयसीसीने ‘या’ स्टार खेळाडूवर केली मोठी कारवाई
या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघांचे नेतृत्व आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केलेले दिग्गज क्रिकेटपटू करणार आहेत. या लीगमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह एकूण १८ सामने आयोजित केले जातील आणि त्यामध्ये माजी दिग्गजांना पुन्हा एकदा खेळताना पाहणे हा एक वेगळा अनुभव असेल.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भाग घेणारे संघ आणि त्यांचे कर्णधार :
भारत: सचिन तेंडुलकर
वेस्ट इंडिज: ब्रायन लारा
श्रीलंका: कुमार संगकारा
ऑस्ट्रेलिया: शेन वॉटसन
इंग्लंड: आयोन मॉर्गन
दक्षिण आफ्रिका: जॅक कॅलिस