BCCI Naman Awards 2025 Lifetime Achievement Awards to Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरचा मोठ्या पुरस्काराने गौरव केला आहे. १ फेब्रुवारी रोजी मुंबईत बीसीसीआयच्या नमन पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बीसीसीआयने मास्टर ब्लास्टरला कर्नल सीके नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सचिन तेंडुलकरला आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून हा खास पुरस्कार प्रदान करण्यात आला. सचिन तेंडुलकरला हा खास पुरस्कार देताना सर्व उपस्थितांनी उभं राहून सचिन तेंडुलकरचं कौतुक केलं. याशिवाय बीसीसीआयने सचिनसाठी एक खास व्हीडिओदेखील तयार केला होता. जो पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी दाखवण्यात आला.
भारतासाठी २०० कसोटी सामने खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने तिन्ही फॉरमॅटमध्ये अमूल्य योगदान दिले आहे. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही सचिनने भारतासाठी चमकदार कामगिरी केली आणि अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. १९८९ मध्ये भारताकडून पदार्पण करणाऱ्या सचिनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१३ मध्ये खेळला. सचिनने जवळपास २५ वर्षे भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरने अनेक अद्वितीय कामगिरी करत मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव क्रिकेटपटू आहे. हे आणि असे अगणित विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
भारतासाठी, सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये ५३.७८ च्या उत्कृष्ट सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत आणि ५१ शतकं झळकावली आहेत, तर ४६३ एकदिवसीय सामने खेळलेल्या या माजी अनुभवी खेळाडूने ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. याशिवाय ४९ शतकंही केली आहेत. सचिनने भारतासाठी १ टी-२० सामना खेळला असून त्यात १० धावा केल्या.