क्रिकेटविश्वातील ध्रुवतारा अशी बिरुदावली सार्थ ठरवणारा.. आपल्या बॅटच्या जोरावर गोलंदाजांबरोबरच टीकाकारांची तोंडे बंद करणारा.. अनेकांना अवीट, सुरेल, सुरेख आणि नजाकतभऱ्या फटक्यांनी भुरळ पाडत स्वर्गीय सुख देणारा.. अनेक मैलाचे दगड पादाक्रांत करत विश्वविक्रमांचे यशोशिखर गाठणारा.. क्रिकेटविश्वामधील प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत असणारा आणि भारतीयांच्या देव्हाऱ्यात जागा मिळवणाऱ्या या क्रिकेटच्या मैदानातील एका युगाच्या निवृत्तीच्या निर्णयाने सारे क्रिकेटविश्व हळहळले. फक्त क्रिकेटसाठीच जन्म झाला असावा, असे एकामेवाद्वितीय मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे वर्णन करता येईल. आपल्या अविस्मरणीय, अप्रतिम, अत्युच्च खेळीने नेहमीच त्याने क्रिकेट विश्वाला आनंद दिला, दुखण्यावर फुंकर घातली, जगण्याची नवी उमेद दिली. आज त्याच सर्वाच्या लाडक्या सचिनने अखेर क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम करण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेटविश्व भावनाविवश झाले आहे. पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सचिनचा दोनशेवा कसोटी सामना होणार असून, या सामन्यानंतर सचिन २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सचिनच्या धावा आटल्या होत्या, धावा करण्यासाठी त्याला झगडावे लागत होते. त्यामुळेच गेल्या वर्षी सचिनने एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीबाबत त्याने गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपला मानस कळवला.
सचिनला सातत्याने लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळेच त्याच्यावर दडपण वाढत होते. त्याचबरोबर संघातील एका युवा खेळाडूची जागा तो अडवत असल्याचे म्हटले जात होते, त्यामुळेच त्याच्या या निर्णयाने क्रिकेटविश्व आश्चर्यचकित झालेले नाही.
सचिनने आतापर्यंत १९८ कसोटी सामन्यांमध्ये ५३.८६ च्या सरासरीने १५,८३७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं शंभर शतके झळकावली असून कसोटीमध्ये ५१ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके त्याच्या नावावर आहेत. निवृत्तीचा निर्णय घेत असताना क्रिकेटशिवाय आयुष्याचा विचार करणे फार कठीण असल्याचे सचिनला वाटते.
‘‘भारतासाठी क्रिकेट खेळायचे, हे माझे स्वप्न होते. हे स्वप्न गेली २४ वर्षे मी जगत होतो. क्रिकेटशिवाय आयुष्याचा विचार करणे फार कठीण आहे, कारण ११ वर्षांचा असल्यापासून मी क्रिकेट खेळत आलो आहे,’’ असे सचिनने बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांना सांगितले.
सचिन पुढे म्हणाला की, देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझा फार मोठा सन्मान होता आणि मी जगभरात क्रिकेट खेळलो. आता माझे सारे लक्ष २००व्या कसोटी सामन्यावर आहे, हा सामना माझ्या घरच्या मातीमध्ये व्हावा, जेणेकरून तो अविस्मरणीय ठरेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकटय़ा सचिनच्या नावावरच शंभर शतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने गेल्या वर्षी निवृत्ती जाहीर केली होती. सचिनने या वेळी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
‘‘मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो, आतापर्यंत त्यांनी मला खेळायची संधी दिली आणि जेव्हा माझ्या हृदयाने निवृत्ती घेण्याचे ठरवले तेव्हा मला निर्णय घेण्याची मुभा दिली. माझ्या कुटुंबीयांनी मला समजून घेतले, संयमी राहिले, याबाबत मी त्यांचा आभारी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांचा आणि शुभेच्छुकांचा मी आभारी आहे, कारण त्यांच्या प्रार्थनेमुळे, शुभेच्छांमुळे मी मैदानात जाऊन सर्वोत्तम कामगिरी करू शकलो,’’ असे सचिन म्हणाला.
सचिनचा दोनशेवा कसोची सामना १४ नोव्हेंबरला मुंबईत होण्याची दाट शक्यता आहे, पण हा सामना मुंबईला बीसीसीआयने दिला, तर तो ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार की वानखेडे स्टेडियमवर, याबाबत संभ्रम आहे. सचिनचा ऐतिहासिक दोनशेवा सामना आयोजित करण्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) उत्सुक असून हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. बीसीसीआयने अजूनही वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांचे ठिकाण जाहीर केलेले नाही.
वेस्ट इंडिजचा भारत दौरा हा पूर्वनियोजित नव्हता. वेळापत्रकात या दौऱ्याची नोंदही नव्हती. त्यामुळेच ही मालिका खेळवण्यामागे सचिनला आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर क्रिकेटला अलविदा करता यावा, या चर्चेला ऊत आला होता.
क्रिकेटमधील या विश्वविक्रमवीराला मानवंदना देण्यासाठी काही माजी क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, के. श्रीकांत, चंदू बोर्डे आणि किरण मोरे हे माजी क्रिकेटपटू सचिनला मानवंदना देतील, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सचिनबद्दल बोलताना, तो विश्वातील सर्वकालीन महान क्रीडापटू असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘‘मी सचिनचा फार मोठा अनुयायी आहे आणि जेव्हा सचिन बुचीबाबू क्रिकेट स्पर्धा चेन्नईला खेळायला यायचा तेव्हापासून मी त्याचा चाहता आहे. भारताकडून खेळलेला तो सर्वात महान क्रिकेटपटू आहे, यात वादच नाही. खरेतर, सचिन हा विश्वातील सर्वकालीन महान क्रीडापटूंच्या यादीत अग्रस्थानावर आहे, असे म्हणायला हवे.
बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले की, आता माझ्या मनात संमिश्र भावना आहे, एका बाजूला मला आनंद होत आहे, तर दुसऱ्या बाजूला दु:खही वाटत आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीतील कामगिरी पाहून मला आनंद होत असला, तरी दुसरीकडे दोनशेव्या कसोटीनंतर तो क्रिकेटला अलविदा करणार असल्याने दु:ख होत आहे.
पाकिस्तानविरुद्ध १५ नोव्हेंबर १९८९ साली सचिनने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यापूर्वी १९८८ साली सहकारी विनोद कांबळीबरोबर हॅरिस शिल्ड या शालेय स्पर्धेमध्ये ६६४ धावांच्या भागीदारीचा विक्रम केला होता. इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते.
मैलाचे दगड
कसोटी क्र. १
१५ नोव्हेंबर १९८९, कराची
प्रतिस्पर्धी : पाकिस्तान
कसोटी क्र. ५०
१४ मार्च १९९७, पोर्ट ऑफ स्पेन
प्रतिस्पर्धी : वेस्ट इंडिज
कसोटी क्र. १००
५ सप्टेंबर २००२, ओव्हल
प्रतिस्पर्धी : इंग्लंड
कसोटी क्र. १५०
८ ऑगस्ट २००८, कोलंबो
प्रतिस्पर्धी : श्रीलंका
कसोटी क्र. २००
१४ नोव्हेंबर २०१३, स्थळ अनिश्चित
प्रतिस्पर्धी : वेस्ट इंडिज