तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकले, असे त्याच्या बाबतीत क्रिकेटच्या मैदानात बऱ्याचदा घडले असले तरी ससंदेतील पहिल्या प्रवेशातच तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आणि राज्यसभेचा सदस्य सचिन तेंडुलकरने उपस्थिती राखली आणि त्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या वर्षी सचिनची एप्रिलमध्ये राज्यसभेच्या सदस्यपदी अभिनेत्री रेखा, उद्योगपती अनू आगा यांच्याबरोबर नियुक्ती करण्यात आली होती. सचिन राज्यसभेमध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला यांच्याबरोबर दाखल झाला. संसदेमध्ये दाखल झाल्यावर त्याने काही खासदारांबरोबर हस्तांदोलन केले आणि तो प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या शेजारी बसला. त्यानंतर सचिन आणि अख्तर यांच्यामध्ये बराच काळ चर्चा रंगली. सचिनची पत्नी अंजली यावेळी प्रेक्षागृहामध्ये बसून सारे पाहत होती.
चॅम्पियन्स करंडकाचे जेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव संसदेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी मांडला, तेव्हा बाके वाजवत सचिननेही आपला आनंद व्यक्त केला. काही वादविवादांमुळे दहा मिनिटे संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले, तेव्हा काही खासदारांनी सचिनची भेट घेतली आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर सचिनने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले.
खासदारांकडून भारतीय क्रीडापटूंचे कौतुक
भारतीय क्रीडापटूंनी विविध खेळांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करीत देशाचा नावलौकिक उंचावला आहे. या खेळाडूंबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांमध्ये विविध पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत खेळाडूंचे कौतुक केले.
सभापती मीरा कुमार यांनी खेळाडूंबद्दल कौतुकास्पद उद्गार व्यक्त करीत सांगितले, ‘‘या खेळाडूंनी यापुढेही आपल्या देशाची शान उंचावण्यासाठी असेच प्रयत्न करावेत. शासन या खेळाडूंच्या पाठीशी आहे.’’
क्रिकेटमध्ये भारताने जून महिन्यात इंग्लंडला पराभूत करीत चॅम्पियन्स चषक स्पर्धा जिंकली तसेच त्यांनी झिम्बाब्वेमध्ये नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत ५-० असा विजय मिळविला. त्याबद्दल या खेळाडूंबद्दल सर्व खासदारांनी अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर केला.
भारतीय तिरंदाजांनी जागतिक स्पर्धेत एक सुवर्ण व दोन कांस्यपदके मिळविली, तर भारतीय महिला हॉकीपटूंनी कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. कुस्तीच्या आशियाई कॅडेट स्पर्धेत भारतीय मल्लांनी तीन सुवर्णपदकांसह १५ पदकांची कमाई केली. आदित्य मेहता याने पुरुषांच्या जागतिक स्नूकर स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. जेनिथा अन्तो हिने अपंगांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या सर्व खेळाडूंबद्दल खासदारांनी गौरवोद्गार व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा