क्रिकेटच्या व्यासपीठावरील महानायक सचिन तेंडुलकरने आपला अखेरचा अंकसुद्धा तितकाच संस्मरणीय पद्धतीने साकारण्याचे मनात पक्के केले आहे. त्याच्या प्रत्येक फटक्यांची नजाकत क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. ‘सचिन.. सचिन..’ हा नाद वानखेडे स्टेडियमवर दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांपासून तब्बल ८२ मिनिटे आसमंतात घुमत होता. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत असताना सचिनने चेतेश्वर पुजारासोबत दिवसअखेपर्यंत किल्ला लढवला. त्यामुळेच वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १८२ धावसंख्येला भारताने २ बाद १५७ असे समाधानकारक प्रत्युत्तर दिले. दुपारच्या सत्रात प्रग्यान ओझा आणि आर. अश्विन या फिरकी गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांला खेळपट्टीवर अजिबात स्थिरावू दिले नाही. तथापि, विंडीजचा निम्मा संघ गुंडाळणाऱ्या ओझाने आपली कामगिरी सचिनला समर्पित केली.
गेली २४ वष्रे क्रिकेटच्या क्षितिजावर तळपणाऱ्या या सूर्याचा सूर्यास्ताच्या दिशेने डोळे दिपवणारा प्रवास सुरू झाला आहे. आपल्या मुलाचा प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना पाहायला आलेली आई रजनी तेंडुलकर, गुरू रमाकांत आचरेकर यांच्यासह देशविदेशातील अनेक मान्यवर मंडळी सचिनसाठी मैदानावर आली होती, तर बाकीच्या मंडळींनी टेलिव्हिजनवर सचिनच्या खेळीचा आनंद लुटला. पण सचिनने या कुणाचीच निराशा केली नाही. दिवसअखेर तो ३८ धावांवर खेळत आहे. त्यामुळेच शुक्रवारी सचिन जगभरातल्या चाहत्यांच्या आशा-अपेक्षांना न्याय देत ‘ये तो सिर्फ झाँकी है, पिक्चर अभी बाकी है..’ या आविर्भावात शानदार शतकी नजराणा पेश करणार का, ही उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वी रोहतक येथे आपल्या अखेरच्या रणजी सामन्यात सचिनने झुंजार खेळी साकारून मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.
१५ नोव्हेंबर १९८९ याच दिवशी सचिनने कराची येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि त्यानंतर साऱ्या क्रिकेटविश्वावर त्याच्या खेळाची जादू पसरली. शुक्रवारी त्या घटनेला २४ वष्रे पूर्ण होत आहे आणि याच ऐतिहासिक दिनी सचिन कोणता पराक्रम दाखवतोय, ही साऱ्यांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ईडन गार्डन्सवरील पहिल्या कसोटीत सचिनला शेन शिलिंगफोर्डने बाद केले होते.
गुरुवारी पॉइंटच्या दिशेने चौकार ठोकून सचिनने सर्वात आधी शेनवरच आक्रमण केले. मग त्याच षटकात त्याने मिडऑनला आणखी एक चौकार खेचला. त्यानंतर शेनॉन गॅब्रिएलला कव्हर ड्राइव्ह, मार्लन सॅम्युअल्सला फाइन लेग आणि पॉइंटचा चौकार हे त्याची मैदानावरील अदाकारी दाखवणारे होते. डॅरेन सॅमीला त्याने ठोकलेला स्ट्रेट ड्राइव्ह चौकार हा लाजवाब असाच होता. वानखेडेवर नाणेफेक जिंकल्यावर महेंद्रसिंग धोनीने सकाळी जेव्हा गोलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वानाच आश्चर्य वाटले होते. परंतु चहापानाला वेस्ट इंडिजचा अख्खा संघ ड्रेसिंग रूममध्ये परतलेला पाहून धोनीचा निर्णय किती योग्य होता, याचा प्रत्यय सर्वानाच आला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी एकंदर १२ फलंदाज बाद झाले आहेत, हे चित्र पाहता हा सामना तिसऱ्या किंवा चौथ्याच दिवशी निकाली लागण्याची शक्यता दिसत आहे. २०११मध्ये भारत-वेस्ट इंडिज कसोटीच्या अखेरच्या दिवशी १७ फलंदाज बाद झाले होते, तर २०१२मध्ये भारत-इंग्लंड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी १५ फलंदाज बाद झाले होते. त्यामुळे फलंदाजांच्या हाराकिरीचे नाटय़ हे वानखेडेसाठी मुळीच नवे नाही. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा केल्या त्या किरान पॉवेलने. परंतु तोही आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. याचप्रमाणे आपल्या कसोटी कारकिर्दीतील दीडशेवी कसोटी खेळणारा शिवनारायण चंदरपॉल २५ धावा काढू शकला. परंतु उपाहार ते चहापान या सत्रावर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी राज्य केले. या सत्रातील २७.२ षटकांत वेस्ट इंडिजचे ८९ धावांच्या मोबदल्यात आठ फलंदाज तंबूत परतले. ओझाने ४० धावांत ५ बळी घेतले, तर अश्विनने ४५ धावांत ३ बळी घेतले.
अश्विनचे बळींचे शतक
फिरकी गोलंदाज आर. अश्विनने डॅरेन सॅमीला भोपळाही फोडू न देता बाद केले आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील शंभराव्या बळीची नोंद केली. दोन वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने १८ कसोटी सामन्यांत हा महत्त्वाचा टप्पा गाठला. हा टप्पा गाठणारा तो १९वा भारतीय खेळाडू आहे.
धोनीचे २५१ बळी
भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी यष्टिपाठी अडीचशे बळींचा टप्पा ओलांडला. वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांचे झेल घेतल्यामुळे ७९व्या कसोटीत त्याच्या खात्यावर २५१ बळी जमा झाले आहेत. यापैकी २१५ फलंदाज झेलबाद तर ३६ यष्टिचीत झाले आहेत.
धावफलक
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ख्रिस गेल झे. शर्मा गो. शामी ११, किरान पॉवेल झे. धवन गो. ओझा ४८, डॅरेन ब्राव्हो झे. धोनी गो. अश्विन २९, मार्लन सॅम्युअल्स झे. विजय गो. ओझा १९, शिवनारायण चंदरपॉल झे. अश्विन गो. कुमार २५, नरसिंग देवनरिन झे. विजय गो. अश्विन २१, दिनेश रामदिन नाबाद १२, डॅरेन सॅमी झे. शर्मा गो. अश्विन ०, शेन शिलिंगफोर्ड पायचीत गो. ओझा ०, टिनो बेस्ट झे. धोनी गो. ओझा ०, शेनॉन गॅब्रिएल झे. धोनी गो. ओझा १, अवांतर (बाइज ८, लेगबाइज ८) १६, एकूण ५५.२ षटकांत सर्व बाद १८२
बाद क्रम : १-२५, २-८६, ३-९७, ४-१४०, ५-१४८, ६-१६२, ७-१६२, ८-१६२, ९-१७२, १०-१८२
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १७-२-४५-१, मोहम्मद शामी १२-२-३६-१, आर. अश्विन १५-२-४५-३, प्रग्यान ओझा ११.२-२-४०-५
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. सॅमी गो. शिलिंगफोर्ड ४३, शिखर धवन झे. चंदरपॉल गो. शिलिंगफोर्ड ३३, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ३४, सचिन तेंडुलकर खेळत आहे ३८, अवांतर (बाइज ८, नोबॉल १) ९, एकूण ३४ षटकांत २ बाद १५७
बाद क्रम : १-७७, २-७७
गोलंदाजी : डॅरेन सॅमी ६-०-२७-०, शेनॉन गॅब्रिएल ६-०-३२-०, शेन शिलिंगफोर्ड १२-१-४६-२, टिनो बेस्ट ५-०-२७-०, मार्लन सॅम्युअल्स ५-०-१७-०.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा