मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दोनशेव्या आणि अखेरच्या कसोटीनिशी शानदार निरोप देण्याचे आपल्यासमोरील महत्त्वाचे ध्येय आहे, असे शरद पवार यांनी १८ ऑक्टोबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर सांगितले होते. त्यासाठी पवार यांनी स्वत:च्याच नेतृत्वाखाली प्रा. रत्नाकर शेट्टी, मिलिंद रेगे, श्रीपाद हळबे आणि विनोद देशपांडे यांचा समावेश असलेली ‘सचिन तेंडुलकर सन्मान समिती’ स्थापन केली होती. परंतु केंद्रीयमंत्री पवार यांची ही समिती फक्त घोषणेपुरतीच मर्यादित राहिल्याचे दिसत आहे. शेट्टी, रेगे आणि हळबे या सन्मान समितीमधील तीन सदस्यांनी तयारीबाबत अनभिज्ञता प्रकट केली.
वानखेडे स्टेडियमवर १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सचिनच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक सामन्यासाठी एमसीएने गेल्या महिन्यात झालेल्या वार्षिक कार्यकारिणीच्या बैठकीतच महत्त्वाची पावले उचलली होती. या वादळी बैठकीच्या अखेरीस पवारांनी सचिनच्या सामन्याचे आव्हान लक्षात घेऊन स्वत:च्याच अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती घोषित केली होती. परंतु आता सचिनचा सामना काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी या सन्मान समितीची एकही बैठक झालेली नाही. ११ नोव्हेंबरला कांदिवली येथे सचिन तेंडुलकर जिमखान्याचे अनावरण होणार आहे. यावेळी एमसीएकडून सचिनचा शानदार सत्कार करण्यात येणार आहे. याचप्रमाणे कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यानही सचिनच्या सन्मानार्थ शानदार योजना एमसीएने आखल्या आहेत. पण ही सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाही सन्मान समितीला मात्र त्याची कोणतीही कल्पना नाही.
याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खेळ विकास महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी म्हणाले की, ‘‘पवार यांनी ही सन्मान समिती जाहीर केली होती. परंतु त्यानंतर कोणत्याही बैठकीचे पत्र आले नाही किंवा आतापर्यंत आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सध्या एमसीएकडून सचिनच्या सन्मानासाठी जी तयारी सुरू आहे, त्यामध्ये माझा सहभाग नाही.’’
मुंबईचे माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांनीही या समितीच्या कार्याबाबत सांगितले की, ‘‘सचिन तेंडुलकर सन्मान समिती तर सर्वासमोर जाहीर झाली. पण त्यानंतर एमसीएने आम्हाला काहीच कळवलेले नाही.’’
एमसीएचे माजी पदाधिकारी श्रीपाद हळबे यांनीही आपली अनभिज्ञता प्रकट करताना सांगितले की, ‘‘मला याविषयी काहीच माहीत नाही. एमसीएने माझ्यासह शेट्टी आणि रेगे यांना अद्याप संपर्क साधलेला नाही.’’

Story img Loader