प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, पण सचिनवर काय आणि किती बोलावे याला बंधनं, मर्यादा, सीमा नाही. कारण आपल्या अद्भुत खेळाच्या जोरावर त्याने क्रिकेटमध्ये अनेक मैलाचे दगड पादाक्रांत केलेले आहेत. पण सचिन एक मित्र म्हणून अजूनही तसाच हळवा आहे, त्याच्यामध्ये अजूनही आपुलकी, जिव्हाळा आहे. कधीही भेटलो तर तो समोरून हात दाखवतो, आपण महान क्रिकेटपटू आहोत हे त्याच्या मैत्रीच्या आणि मित्रांच्या आड कधीही आलेले नाही. क्रिकेटमध्ये त्याने अनेक शिखरे गाठलेली असली तरी त्याचे पाय अजूनही तसेच जमिनीवर आहेत. पण माझ्यामध्ये थोडासा बदल झाला आहे, मी सुरुवातीला त्याला तेंडल्या बोलायचो, त्यानंतर सचिन बोलायला लागलो आणि आता मास्टर म्हणतो, त्याच्या आतापर्यंतच्या खेळींमुळे त्याचाबद्दलचा आदर नक्कीच वाढला आहे.
सचिनबद्दल काय बोलायचं, त्याच्याबरोबर मलाही पदार्पण करता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. त्याच्याकडून बरंच काही शिकता आलं. सचिनने स्वत:ला क्रिकेटसाठी वाहून घेतले होते. तो क्रिकेट जगला, त्याला स्वप्नही क्रिकेटचीच पडत असावीत, त्याच्या बोलण्यात, खाण्यात, पिण्यात, बघण्यात फक्त आणि फक्त क्रिकेटंच असायचं आणि त्यामध्ये अजूनही फरक पडलेला नाही.
सचिन जसा क्रिकेटमध्ये खराखुरा हिरा आहे, तसाच तो अस्सल खवय्याही आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो, आम्ही श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा त्यांच्या मंडळातील विक्रमसिंगजी यांनी भारतीय संघाला जेवायला बोलवले होते. सर्वाच्या गप्पा, टप्पा सुरू होत्या. सचिनला जाम भूक लागली होती. तो मला म्हणाला, त्यांना विचार आता जेवायला बसलो तर चालेल का? तो थोडासा लाजरा असल्याने स्वत:हून फार कमी बोलायचा. मी त्यांना विचारले, आम्ही दोघे जेवायला बसलो तर तुमची हरकत नाही ना? यावर त्यांनी आम्हाला जेवायला वाढलं, सचिनचे आवडते खेकडे होते. आम्ही जेवायला बसलो आणि काही वेळात सर्वच्या सर्व खेकडे आम्ही संपवले. सचिनने त्यानंतर विचारले अजून खेकडे आहेत का? त्यावर एवढेच खेकडे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही विचारले, किती खेडके होते? त्यावर ते म्हणाले संपूर्ण संघ येणार म्हणून आम्ही ७५ खेकडे आणले होते, ते सारे तुम्हीच फस्त केले. हे जाऊन त्यांनी संघाला सांगितले आणि संपूर्ण संघाला फक्त खेकडय़ाच्या सारावरच समाधान मानावे लागले. सचिनला खेकडे फार आवडतात. तसंच त्याला बिर्यानी, मासेही फार आवडतात. आमच्या दोघांचा आवडता पदार्थ म्हणजे हलीम. आम्ही जेव्हा जेव्हा हैदराबादला जायचो, तेव्हा गेल्या गेल्या आम्ही हलीम खायला मागवायचो आणि त्यावर ताव मारायचो.
सचिनने निवृत्ती घेतल्याने मनात थोडी खंत असली तरी मी त्याच्या या निर्णयाने मी आनंदी आहे. कारण त्याचं देशाला प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. विश्वचषक जिंकला, आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगही जिंकली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा द्विशतक त्याने झळकावले, अनेक विश्वविक्रम त्याने रचले, त्याची कारकीर्द सार्थकी लागली. पण एक गोष्ट मात्र नक्की, दुसरा सचिन होणे नाही.

Story img Loader