विश्वचषक स्पर्धेत भारताने शेवटच्या षटकापर्यंत लढा देत सामन्यात बाजी मारली. २२५ धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी फटकेबाजी करुन भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. मात्र जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत अफगाणिस्तानला बॅकफूटला ढकललं. त्याच्या या कामगिरीसाठी बुमराहला सामनावीराता किताब देऊन गौरवण्यात आलं. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव म्हणून परिचीत असलेल्या सचिन तेंडुलकरने बुमराहचं कौतुक केलं आहे.

“अखेरपर्यंत सामन्यावर अफगाणिस्तानचं वर्चस्व होतं. बुमराहच्या अखेरच्या षटकांमध्ये आपल्याला जे दोन बळी मिळाले त्यावेळी आपण सामन्यात पुनरागमन केलं. लागोपाठ विकेट गेल्यामुळे अफगाणिस्तान बॅकफूटवर गेलं. अखेरच्या षटकांमध्ये निर्धाव चेंडू टाकणं ही मोठी गोष्ट आहे. बुमराहची ती षटकं सामन्याचा टर्निंग पॉईंट होती.” सचिन India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होता.

बुमराहने केलेल्या भेदक माऱ्यामुळे मोहम्मद शमीला अखेरच्या षटकांमध्ये १६ धावा वाचवण्याचं आव्हान मिळालं. अखेरच्या षटकात हॅटट्रीक घेत शमीने आपल्यावरचा विश्वासही सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहने १० षटकांत ३९ धावा देत २ बळी घेतले. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना गुरुवारी मँचेस्टरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : धोनी-केदार जाधवने संथ खेळ केला, सचिन तेंडुलकर नाराज

Story img Loader