हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २००९मध्ये झालेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील अविस्मरणीय सामना असल्याचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आवर्जून सांगतो. सचिनने त्या सामन्यात १७५ धावांची वादळी खेळी साकारली होती. ती खेळी आपल्या कारकीर्दीतील एक सर्वोत्तम खेळी असल्याचे सचिनने नमूद केले. परंतु त्या सामन्यात भारत दुर्दैवीरीत्या पराभूत झाला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तो पाचवा सामना हैदराबादमध्ये रंगला. ऑस्ट्रेलियाचे विजयासाठीचे ३५१ धावांचे अशक्यप्राय आव्हान सचिनने पेलले होते. पण भारत विजयासमीप आला असताना सचिन बाद झाला आणि हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. ‘‘त्या सामन्यात आमची मधली फळी डासळली. परंतु सुरेश रैनाने समर्थपणे मला साथ दिली. आम्ही १३७ धावांची भागीदारी रचली. भारताची धावसंख्या २९९ झाली असताना ४३व्या षटकात सुरेश रैना यष्टीपाठी झेल देऊन माघारी परतला. मग हरभजन सिंग बाद झाल्यामुळे भारताची अवस्था ६ बाद ३०० झाली. परंतु सामन्यावर भारताचे नियंत्रण आहे, यावर माझा विश्वास होता,’’ असे सचिनने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘आम्ही फक्त १९ धावांच्या अंतरावर असताना क्लिंट मकायच्या गोलंदाजीवर शॉर्ट फाइन-लेगच्या डोक्यावरून फटका खेळण्याच्या प्रयत्नात नॅथन हॉरित्झकडे माझा झेल गेला. माझी घोर निराशा झाली. तळाच्या फळीनेही प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु अखेरच्या षटकांमध्ये बळी जात राहिले आणि आम्हाला विजयासाठी फक्त ३ धावा कमी पडल्या.
हैदराबादची ती खेळी आणि १९९८मध्ये शारजात साकारलेली दोन शतके यांच्यातील तुलनेविषयी सचिन म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध साकारलेल्या या दोन खेळींविषयी मला नेहमी तुलना करायला सांगितले जाते. या दोन बाबतीत तुलना होऊ शकते, असे मला वाटत नाही. शारजामधील तिरंगी क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम टप्प्यात अपेक्षांचे दडपण कमालीचे उंचावले होते.’’
‘‘हैदराबादमधील शतक हे दोन संघांमधील मालिकेत साकारलेले होते. त्यामुळेच शारीरिक आणि मानसिक परिस्थिती पूर्णत: भिन्न होती,’’ असे सचिन पुढे म्हणाला.
१७५ धावांची ‘ती’ खेळी अविस्मरणीय -सचिन
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २००९मध्ये झालेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील अविस्मरणीय सामना असल्याचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आवर्जून सांगतो. सचिनने त्या सामन्यात १७५ धावांची वादळी खेळी साकारली होती. ती खेळी आपल्या कारकीर्दीतील एक सर्वोत्तम खेळी असल्याचे सचिनने नमूद केले.
First published on: 01-03-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar have gladly traded his knock of 175 against australia