पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर अनेकवेळा यूट्यूबवर क्रिकेटबद्दल विश्लेषण करतो. जुन्या गोष्टींवरही तो अनेकदा प्रतिक्रिया देतो. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबाबत अख्तरने एक मत दिले आहे. अख्तरने सध्याच्या डीआरएस सुविधेबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला, ”आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या सुविधा आधी असत्या तर सचिन तेंडुलकरने एक लाख धावा केल्या असत्या.”
रवी शास्त्रींसोबतच्या संवादादरम्यान त्याच्या यूट्यूब चॅनलवर अख्तर म्हणाला, ”तुमच्याकडे दोन नवीन चेंडू आहेत. तुम्ही नियम कडक केलेत. तुम्ही आजकाल फलंदाजांना खूप फायदा देता. तुम्ही आता तीन डीआरएसची (DRS) परवानगी देता. सचिनच्या काळात तीन डीआरएस मिळाले असते, तर त्याने एक लाख धावा केल्या असत्या.”
अख्तर पुढे म्हणाला, ”मला सचिनची दया येते, कारण तो सुरुवातीला वसीम अक्रम आणि वकार युनूसविरुद्ध आणि नंतर शेन वॉर्नविरुद्ध खेळला. याशिवाय त्याने ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांचाही सामना केला. त्यानंतर तो पुढच्या पिढीच्या गोलंदाजांविरुद्धही खेळला, त्यामुळे मी सचिनला कठीण फलंदाज मानतो.”
हेही वाचा- VIDEO : ‘अण्णा’ची स्टाइलच भारी..! अश्विननं केला Srivalli गाण्यावर डान्स; एकदा पाहाच!
विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने त्याच्या काळात जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना केला होता. त्यावेळी प्रत्येक संघात एक किंवा दोन दिग्गज गोलंदाज असायचे आणि खेळपट्ट्यांवर टिकून राहणे सोपे काम नव्हते. कसोटी क्रिकेटमध्ये जुन्या काळातील फलंदाज आजच्या काळाच्या तुलनेत जास्त वेळ क्रीजवर थांबायचे. त्यामुळे अख्तरच्या म्हणण्यानुसार, आता अधिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्याचा फायदा फलंदाजांना होतो, असे म्हणता येईल.