मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज इंग्लंडविरूध्दच्या कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकून आपल्या फलंदाजीच्या जोरावर टिकारांना चोख उत्तर दिले. त्यामुळे सचिनने निवृत्तीचा विचार करावा म्हणून घोषा करणा-यांची तोंडे आता बंद होणार आहेत. कोलकातामधील ईडन गार्डनवर सुरू असलेल्या भारत विरूध्द इंग्लंडच्या कसोटी सामन्यात सचिनने अर्धशतक झळकावले. जवळपास अकरा महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर इग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसनला लागोपाठ दोन चौकार सचिनने अर्धशतक पूर्ण केले. सचिनने ९९ चेंडूत ९ चौकारासह ५० धावा पूर्ण केल्या आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ४ बाद १९५ धावा झाल्या होत्या.  
सचिनच्या आधी भारताचा सलामीवीर गौतम गंभीर यानेही ८४ चेंडूत १० चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. गंभीरने विरेंद्र सेहवागसोबत ४७ धावांची भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. २६ चेंडूत तीन चौकार मारून सेहवाग २३ धावांवर धावबाद झाला. गेले दोन सामने चांगली कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा आज मात्र आपली कमाल दाखवू शकला नाही. त्याने ४८ चेंडूत दोन चौकारासह १६ धावा केल्या. मॉन्टी पानेसरने त्याला आपल्या फिरकीवर चकवत बोल्ड केले.  
आज (बुधवार) सकाळी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

Story img Loader