Amir Hussain Lone Appreciated by Sachin Tendulkar : भारतात क्रिकेटचे बरेच चाहते आहेत, असा कोणी नसेल की ज्याला क्रिकेट हा खेळ माहित नाही. क्रिकेटचे व्हिडिओ बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, परंतु यावेळी आमिर हुसैन लोन या पॅरा क्रिकेटपटूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खूप खास आहे. ज्याने-ज्याने हा व्हिडीओ पाहिला त्याने या पॅरा क्रिकेटपटूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. इतकेच नाही तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने देखील या क्रिकेकपटूचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट लिहून व्हिडीओ शेअर केला आहे.
आमिरच्या व्हिडीओने सचिन तेंडुलकरही झाला प्रभावित –
अमीर हुसेनचा हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. त्यानंतर जेव्हा टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आमिरचा व्हिडिओ पाहिला, तेव्हा तो खूप प्रभावित झाला. यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, “आमिरने अशक्यही शक्य केले. त्याचे खेळावर किती प्रेम आणि समर्पण आहे हे स्पष्ट होते. हे पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. मी एक दिवस अमीरला भेटेन आणि त्याच्या नावाची जर्सी विकत घेईन. लाखो लोकांना प्रभावित केल्याबद्दल धन्यवाद.”
कोण आहे पॅरा क्रिकेटर आमिर हुसैन लोन?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ जम्मू -काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा क्रिकेटर आमिर हुसैन लोन याचा आहे. ३४ वर्षीय आमिर हुसैन सध्या जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहेत. वयाच्या ८ व्या वर्षी आमिरचा अपघात झाला होता. या अपघातात अमीरने दोन्ही हात गमावले असूनही त्याला क्रिकेटबद्धल प्रचंड आवड आहे. तो दोन्ही हातांशिवाय चमकदार क्रिकेट खेळतो. अमीर हा बिजबेहरातील वाघमा गावचा राहणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अमीरचा क्रिकेट खेळताना व्हिडीओ ज्या-ज्या लोकांनी पाहिला, ते आमिरचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
हेही वाचा – खांदा आणि गळ्याच्या सहाय्याने फलंदाजी, पायाने गोलंदाजी; काश्मीरच्या आमिर हुसैनची प्रेरणादायी गोष्ट
२०१३ साली आमिरच्या शिक्षकाने त्याला क्रिकेट खेळताना पाहिले. दोन्ही हात नसतानाही आमिरची क्रिकेट खेळण्याची जिद्द आणि त्याच्यातले कौशल्य पाहून त्याला पॅरा क्रिकेटची ओळख करून दिली. आमिर हुसैन गळा आणि खांद्यात बॅट धरून फलंदाजी करतो आणि पायाच्या अंगठा आणि इतर बोटांच्या चिमटीत बॉल धरून पायाने गोलंदाजी करतो. हे शब्दात सांगताना आपल्याला सहजा सहजी यावर विश्वास बसणार नाही. पण आमिरच्या क्रिकेट कौशल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच क्रिकेट चाहत्यांना त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.
अपघातात गमावले दोन्ही हात –
१९९७ साली आमिर हुसैन लोन केवळ आठ वर्षांचा असताना एका अपघातात त्याला दोन्ही हात गमवावे लागले. काश्मीर न्यूज ऑब्जर्व्हर या वृत्तसंस्थेसी बोलताना आमिरने सांगितले की, लहान असताना तो वडीलांच्या लाकूड कापण्याच्या कारखान्यात डबा द्यायला गेला होता. त्यावेळी कारखान्यातील यंत्रामध्ये त्याचे जॅकेट अडकल्यामुळे त्याचा अपघात झाला. आपल्या मुलाला दोन्ही हात गमवावे लागल्यामुळे वडील बशीर अहमद लोन यांनी नंतर कारखानाच बंद करून टाकला. तरीही त्याने हार न मानता क्रिकेट खेळण्याची उमेद सोडली नाही. त्याने क्रिकेट खेळण्यासाठी स्वतःची शैली विकसित केली.