सचिन रमेश तेंडुलकर हे काय रसायन आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात आला. हरयाणाच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईचे फलंदाज एकामागून एक धारातीर्थी पडत असताना सचिनने साकारलेल्या दर्जेदार नाबाद ५५ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईचा संघ विजयाच्या उंबरठय़ावर असून सचिनच्या भरवशावर मुंबईचा पहिला विजय अवलंबून असेल. तिसऱ्या दिवसअखेर मुंबईने ६ बाद २०१ अशी मजल मारली असून विजयासाठी अजूनही ३९ धावांची गरज आहे.
गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर फलंदाजीचा उत्तम वस्तुपाठ सचिनने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दाखवला. मुंबईचे वसिम जाफर (१) आणि अजिंक्य रहाणे (४७) हे बिनीचे फलंदाज बाद झाल्यावर सचिन रणजी क्रिकेटमधील अखेरची खेळी साकारण्यासाठी मैदानात आला. त्यानंतर काही वेळात सलामीवीर कौस्तुभ पवारही (४७) बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या टोकाकडून ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत असताना सचिनने संयतपणे फलंदाजी करत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या नाहीत, तर त्या पल्लवितही केल्या. एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घालत संधी मिळेल तेव्हा चेंडू सीमारेषेपार करायला सचिन कचरला नाही. पहिल्या डावात पाच विकेट्स मिळवणाऱ्या जोगिंदर शर्माला ‘स्क्वेअर लेग’ला दोन धावा घेत सचिनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ११५ वे अर्धशतक झळकावले. सचिनने १२२ चेंडूंत ४ चौकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावांची खेळी साकारली.
सचिनच्या या आधारस्तंभासारख्या खेळीच्या जोरावर मुंबईने दोनशे धावांचा पल्ला गाठला असून मुख्यत्वेकरून त्याच्यावरच मुंबईचा विजय अवलंबून असेल.
तत्पूर्वी, सोमवारच्या ९ बाद २२४ या धावसंख्येवरून पुढे खेळताना हरयाणाचा डाव २४१ धावांवर संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
हरयाणा (पहिला डाव) : १३४
मुंबई (पहिला डाव) : १३६
हरयाणा (दुसरा डाव) : २४१
मुंबई (दुसरा डाव) : ७५ षटकांत ६ बाद २०१ (सचिन तेंडुलकर नाबाद ५५, कौस्तुभ पवार ४७, अजिंक्य रहाणे ४०; मोहित शर्मा २/५५).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा