मातृप्रेमासाठी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना मुंबईत खेळवण्यात यावा, अशी बीसीसीआयकडे मागणी करणाऱ्या सचिन तेंडुलकरने आता आपल्या आईला वानखेडे स्टेडियमवरील प्रेसिडेंट कक्षातून या सामन्याचा आनंद लुटता यावा, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) सूचना करीत विशेष मार्गिकेची व्यवस्था केली आहे. व्हीलचेअरवर असणाऱ्या आपल्या आईला व्यवस्थित नेता यावे, यासाठी प्रवेशद्वारापासून कक्षापर्यंतचा मार्ग तयार करण्याच्या सूचना सचिनने एमसीएला केल्या आहेत.
रणजी स्पर्धेसाठी मुंबई संघासोबत सराव करण्यासाठी सचिन वानखेडे स्टेडियमवर सोमवारी आला असताना त्याने एमसीएच्या पदाधिकाऱ्यांशी याविषयी प्रदीर्घ चर्चा केली. त्या वेळी एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या लोखंडी मार्गिकेवर सचिनने नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत सचिनची आई रजनी तेंडुलकर यांनी आपल्या मुलाचा एकही सामना स्टेडियमवर जाऊन पाहिलेला नाही, पण सचिन कारकिर्दीतील अखेरचा सामना मुंबईतच खेळणार असल्यामुळे हा सामना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी त्या उत्सुक आहेत. पण कक्षापर्यंत जाण्यासाठी असलेली एमसीएच्या इमारतीतील उद्वाहक आकाराने फारच लहान आहे, म्हणूनच सचिनने आपल्या आईला कक्षापर्यंत नेण्यासाठी मार्गिका बसवण्याचे एमसीएला सांगितले आहे.
येत्या काही दिवसांत याबाबतची सर्व तयारी केली जाईल, असे आश्वासन एमसीएचे सहसचिव नितीन दलाल यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘सचिनच्या कुटुंबीयांना आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. सचिनच्या आईला कोणताही त्रास न होता प्रेसिडेंट कक्षापर्यंत पोहोचता यावे, यासाठी आम्ही मार्गिका तयार करणार आहोत.’’
दरम्यान, सचिनला निरोप देण्यासाठी एमसीएनेही जय्यत तयारी सुरू केली आहे. सचिनला निरोपाचे बक्षीस देण्याकरिता त्याच्या आवडीचे त्याचे चित्र बनवण्याकरिता त्याच्या घरी चित्रकाराला पाठवले जाणार आहे. तसेच २००व्या कसोटीदरम्यान सचिनच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनची क्षणचित्रे वानखेडे स्टेडियमवर लावण्यात येणार आहेत.

Story img Loader