Sachin Tendulkar On Ind Vs Pak Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज (२३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबईतील आंदरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असल्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींचं याकडे लक्ष लागलं होतं. अखेर भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकलं. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला.
या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन तेंडुलकरने काय म्हटलं?
“एका बहुप्रतिक्षित सामन्याचा परिपूर्ण शेवट, एक वास्तविक नॉकआउट”, असं म्हणत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. तसेच विराट कोहलीने केलेल्या शानदार शतकाचंही सचिन तेंडुलकरने कौतुक केलं आहे. तसेच टीम इंडियाच्या बॉलर्सचंही कौतुक केलं आहे.
A perfect ending to the most awaited match. A real knockout!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 23, 2025
Team India ????
Superb knocks by @imVkohli, @ShreyasIyer15, and @ShubmanGill, and wonderful bowling by our bowlers especially @imkuldeep18 and @hardikpandya7!#INDvsPAK
विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास लिहिला. विराटने एका खास यादीत जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे जो आतापर्यंत क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. पाकिस्तानविरूद्ध सामन्यात १५ धावा करत विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण करून इतिहास लिहिला आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा करणारा फलंदाज आहे. त्याने केवळ २८७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा १९ वर्ष जुना विश्वविक्रम मोडला आहे.
सचिनने वनडे क्रिकेटमध्ये ३५० डावात १४ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनने २००६ साली पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून या धावा पूर्ण केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात १४ हजार हून अधिक धावा करणारा विराट कोहली हा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचा सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा) आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (१४२३४ धावा) यांनी ही कामगिरी केली होती.