भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी काही खास टिप्स दिल्या आहेत. या दोघांनी न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कशी फलंदाजी करावी, हे सचिनने सांगितले आहे. हा सामना १८ जूनपासून साऊथम्प्टनमध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडियाचे सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना मैदानात उतरावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मुलाखतीत सचिन म्हणाला, ”एकदा फटका खेळण्यासाठी दोघांनाही शरीराच्या जवळ बॅट ठेऊन खेळले पाहिजे. बॅट उचलताना आपले हात आपल्या शरीराच्या शक्य तितक्या जवळ असले पाहिजेत. दोन्ही संघांच्या गोलंदाजीत समान सामर्थ्य आहे, परंतु इंग्लंडमध्ये डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळल्यामुळे न्यूझीलंड चांगल्या स्थितीत असेल. न्यूझीलंडच्या गोलंदाजीत विविधता आहे. टीम साऊदीचा चेंडू डावखुऱ्या फलंदाजांसाठी बाहेरच्या बाजूला जातो. ट्रेंट बोल्ट चेंडू आत आणतो. काईल जेमीसन वेगवान गोलंदाजी करते, तर नील वेगनर शॉट खेळपट्टीच्या चेंडूंचा चांगला उपयोग करतो.”

हेही वाचा – शास्त्री मास्तरांची बातच न्यारी..! इंग्लंडमध्ये ‘श्वाना’सोबत केली सरावाची तयारी

पुजाराच्या टीकाकारांना सचिनने फटकारले

सचिन तेंडुलकरने पुजाराच्या स्ट्राईक रेटबाबत टीका करणाऱ्यांना फटकारले. तो म्हणाला, ”कसोटी संघातील सर्व खेळाडूंचे वैशिष्ट्य वेगळे आहे आणि पुजारा हा आपल्या संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. पुजाराने त्याच्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी जे काही केले, ते पाहणे मला आवडते. त्याचा संयम अफलातून आहे. त्याच्यावर टीका करण्याऐवजी आपण त्याचे कौतुक केले पाहिजे. तो त्याच्यानंतर फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ तयार करून देतो. त्याने ६-७ चेंडू निर्धाव घालवले, त्याच्यापेक्षा त्याने पाच दिवसात काय केले याबद्दल बोलले पाहिजे.”

रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांच्याबद्दल सचिन म्हणाला, ”दोघांनाही परिस्थितीनिसार गोलंदाजी कशी करावी हे माहीत आहे. अव्वल फिरकीपटू जगात कुठेही जाऊन चांगली गोलंदाजी करू शकतात. त्यामुळे त्यांना चेंडूला कसा वापर करावा, चेंडूची चकाकणारी बाजू कुठे ठेवावी हे कळते.”

हेही वाचा – मोठी बातमी..! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा

भारतीय महिला संघाच्या कसोटी सामन्याबाबत सचिनचे मत

भारतीय महिला संघ उद्या म्हणजे १६ जूनपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू कसोटी पदार्पण करतील. शिवाय महिला संघ तब्बल ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळणार आहे. संघाची युवा फलंदाज शफाली वर्मा कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे. याबद्दल सचिन म्हणाला, ”मी तिच्यासाठी आनंदी आहे. मर्यादित षटकांचे क्रिकेट ते कसोटी क्रिकेट असा बदल घडताना एक वेगळी मानसिकता लागले. तम्हाला ४ दिवस फलंदाजी कशी करावी हे ठरवावे लागले. तुमच्या तंदुरुस्तीची चाचणी होते. अनुभवी खेळाडू पदार्पण करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतील. १७ वर्षाच्या शफालीसाठी हा सुंदर क्षण असेल. मी तिला खेळताना पाहिले आहे. तिचा बिनधास्तपणा आणि आक्रमक फलंदाजी बघण्यासारखी असते आणि हे मी तिला सांगितले आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar opens up about indias wtc final against new zealand adn