Sachin Tendulkar Batting: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२ साठी इंडिया लिजेंड्सने कानपूरमध्ये दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा ६१ धावांनी पराभव करत सत्राला चांगली सुरुवात केली आहे. स्टुअर्ट बिन्नीने ४२ चेंडूत ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली तर त्यानंतर राहुल शर्माच्या १७ धावांत ३ बळींमुळे भारताचा पगडा यास्पर्धेत भारी झाला आहे. हा सर्व आनंद एकीकडे पण चाहत्यांसाठी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मंत्रमुग्ध करणारा ओव्हर-द-टॉप-शॉट पाहणे हा सर्वात सुंदर क्षण होता. स्वतः क्रिकेटचा देव इतक्या मोठ्या कालावधीनंतर समोर खेळताना पाहून सर्वांना १९९६ ची आठवण झाली.

नाणेफेक जिंकून इंडिया लिजेंड्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून सचिन नमन ओझासोबत सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. आपल्या डावाला चांगली सुरुवात केल्यानंतर, चौथ्या षटकात सचिनने मखाया एनटिनीच्या चेंडूला चौकार लगावला. एका षटकानंतर, वेगवान गोलंदाज योहान व्हॅन डर वॅथच्या चेंडूवर, त्याने वरच्या बाजूला बॅट फिरवून चेंडूला सीमापार पाठवले. हा शॉट पाहून पुन्हा एकदा स्टेडियममध्ये ‘सचिन सचिन’ स्वर दुमदुमला आणि खरोखरच एक सुंदर क्षण त्यावेळी पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या शॉटचे व्हिडीओजही व्हायरल होत आहेत.

पहा सचिनची वापसी

पॉवरप्लेनंतर ओझा चेंडूवर बाद होण्यापूर्वी १५ चेंडूत १६ धावा करून गेला. इंनंतर सुरेश रैना आणि बिन्नी यांनी मिळून डावाला स्थैर्य मिळवून दिले आणि ६४ धावांची भागीदारी केली, युसूफ पठाणने १५ चेंडूत ३५ धावा करत भारताला २० षटकांत ४ बाद २१७ धावा पूर्ण करण्यास मदत केली.

दक्षिण आफ्रिकेने 43 धावांची सलामी दिली आणि राहुल शर्मा आणि प्रग्यान ओझा यांनी १२ षटकांत ९० धावांत प्रत्येकी दोन गडी बाद केल्याने आघाडीच्या फळी कोसळल्या. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जॉन्टी र्‍होड्सने २७ चेंडूत नाबाद ३८ धावा करत एकाकी झुंज दिली पण त्याला साथ न मिळाल्याने अवघ्या १५६ धावा करूनच आफ्रिकेचे आव्हान संपुष्ठात आले.