Sachin Tendulkar on Manu Bhaker Bronze Medal Win: मनू भाकेरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीत भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. मनू भाकेरचे ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेतील हे पहिले पदक आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनू भाकेरचे कौतुक करत संपूर्ण देशाला अभिमान वाटला असल्याचे म्हटले आहे. पण यासोबतच त्याने तिला शुभेच्छा देताना तिच्या प्रवासाबद्दल काय म्हटले आहे, जाणून घ्या.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) नेमबाज मनू भाकेरचे पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन करताना लिहिले, “मनू भाकेर, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन! “टोकियोमध्ये घडलेल्या प्रसंगानंतर, तू पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकण्यासाठी प्रचंड ताकद आणि दृढनिश्चय दाखवलास आणि भारताला अभिमान वाटणारी अशी कामगिरी करून दाखवली आहेस.
मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले. कोरियाच्या ओह ये जिनने २४३.२ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक विक्रमही केला. कोरियाची किम येजी रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. तिने२४१.३ गुण मिळवले. मनू भाकरने २२१.७ गुण मिळवत कांस्यपदकावर कब्जा केला.
मनू भाकर ही देशासाठी १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तुलामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली होती. तिच्या पिस्तुलमध्ये काही दोष असल्याने ती चांगली कामगिरी करू शकली नाही आणि पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. मात्र, यावेळी तिने मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. मनू भाकेरकडून पदकाची अपेक्षा होती आणि ती तिने पूर्णही केली आहे. यासह आता मनू भाकेर नेमबाजीच्या गट सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.