भारतीय संघात सध्या नवनवे खेळाडू येत आहेत आणि आणि आपली छाप पाडत आहेत. यापैकी पृथ्वी शॉ हा एक उत्तम खेळाडू आहे. फलंदाजी करताना संयम महत्वाचा असतो. पृथ्वीच्या वयाच्या तुलनेत त्याच्यात असलेला संयम नक्कीच स्तुत्य आहे आणि असे असणे एका चांगल्या खेळाडूचे लक्षण आहे, अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याची स्तुती केली आहे. तेंडुलकर ग्लोबल मीडलसेक्स अकादमीच्या नवी मुंबईतील उदघाटनाच्या शिबिरात तो बोलत होता.
पृथ्वी हा हळूहळू परिपक्व खेळाडू म्हणून उदयास येत आहे. तो प्रतिभावान खेळाडू असून त्याची बुद्धिमत्ता तल्लख आहे. त्याला एखादी गोष्ट सांगितली कि तो ती लवकर आत्मसात करतो, असेही तो म्हणाला. याशिवाय, गोलंदाज खलील अहमद हा ‘आयपीएल’मध्ये ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळतो. मी त्याचा खेळ जवळून पाहिला आहे. त्यामुळे त्याचे क्रिकेटमधील भविष्य उज्वल आहे, असा विश्वासही सचिनने व्यक्त केला.
सध्या भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी तरुण खेळाडूंची चढाओढ सुरू आहे. पण हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे. कारण अशी स्पर्धा असेल, तरच उत्तमोत्तम खेळाडू आपल्याला मिळू शकतील, असे मतही त्याने व्यक्त केले.
याशिवाय, भारताच्या पुढील काळात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतही त्याने भाष्य केले. तो म्हणाला की ऑस्ट्रेलियात भारताला आपले कसब दाखवावे लागणार आहे. वर्ल्डकपआधी आपल्या खेळाडूंना वेगवान खेळपट्ट्यांवर खेळायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान गोलंदाजांसमोर भारताला आपला खेळ चाचपून घेण्याची ही चांगली संधी आहे. कारण उसळत्या खेळपट्ट्यांवर सराव करायला मिळणे हे आपल्याला वर्ल्डकपसाठी फायफेशीर ठरणार आहे, असे या वेळी सचिनने नमूद केले.