उच्चांकांचा बादशहा सचिन तेंडूलकरने नव्या उच्चांकाला गवसणी घालत शनिवारी त्याच्या कारकिर्दीतील सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५० हजार धावांचा टप्पा गाठला.
चॅमपिअन्स लिग क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्स आणि त्रिनिदाद, टोबॅगो यांच्या दरम्यानच्या सामन्यात सचिन तेंडूलकरने ३१ चेंडूंमध्ये ३५ धावा करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५० हजार धावा पूर्ण केल्या.
दरम्यान, भेदक मारा आणि दमदार ९० धावांच्या सलामीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने उपांत्य फेरीत त्रिनिदाद आणि टोबॅगो संघावर सहा विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली . मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील ५० हजार धावा पूर्ण केल्या आणि हे या सामन्याचे खास वैशिष्टय़ ठरले.
मुंबईने नाणेफेक जिंकत त्रिनिदादला फलंदाजीला पाचारण करत त्यांना १५३ धावांवर रोखले. त्रिनिदादचे फलंदाज झटपट माघारी परतत असताना सलामीवीर इव्हिन लूइसने ४६ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ६२ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.
त्रिनिदादच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सचिन आणि ड्वेन स्मिथ यांनी ९० धावांची दणदणीत सलामी देत विजयाचा पाया रचला. सचिनने २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ३५ धावांची खेळी साकारली, तर सामनावीर ड्वेन स्मिथने ३८ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ५९ धावांची दणकेबाज खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
त्रिनिदाद आणि टोबॅगो : २० षटकांत ५ बाद १५३ (इव्हिन लूइस ६२, किरॉन पोलार्ड १/१६, प्रग्यान ओझा १/१६) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.१ षटकांत ४ बाद १५७ (ड्वेन स्मिथ ५९, सचिन तेंडुलकर ३५; सुनील नरीन ३/१७)
सामनावीर : ड्वेन स्मिथ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा