क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मुलाची म्हणजेच अर्जुन तेंडुलकर याची भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड करण्यात आली. आपल्या कारकिर्दीत अगणित विक्रमांची नोंद करणाऱ्या सचिनची पुढची पिढी आता मैदान गाजवण्यासाठी उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सोशल मीडियावर त्याच्या निवडीबाबत प्रतिक्रियांचा पाऊस पडला. पण वडील म्हणून सचिनची प्रतिक्रिया ही सर्वात महत्वाची ठरली.

त्याच्या संघातील निवडीबाबत सचिनने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की मी आणि माझी पत्नी अंजली, आम्ही दोघेही अर्जुनच्या संघातील निवडीबाबत अतिशय आनंदी आहोत. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा मैलाचा दगड आहे. त्याच्या आयुष्याच्या आणि करिअरच्या दृष्टीने हा एक दिशा देणारा क्षण आहे.

एका मुलाचे पालक म्हणून तो काय करू इच्छितो हेदेखील त्याने यावेळी सांगितले. सचिन म्हणाला की मी आणि अंजली कायम त्याला पाठिंबा देत राहू. अर्जुनने निवडलेल्या गोष्टींमध्ये आम्ही त्याला नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य करू आणि त्याने आपली कारकीर्द यशस्वी करावी, यासाठी आम्ही नक्कीच प्रार्थना करणार आहोत, असेही सचिनने सांगितले.

जुलै महिन्यात भारताचा १९ वर्षाखालील संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन ४ दिवसीय सामने आणि ५ वन-डे सामने खेळणार आहे. अर्जुनची या दौऱ्यात चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवड करण्यात आलेली आहे. मात्र, वन-डे संघात स्थान मिळवणे त्याला शक्य झालेले नाही.

आशिष कपूर, ज्ञानेंद्र पांडे, राकेश पारिख यांच्या निवड समितीने अर्जुनची संघात निवड केलेली आहे. या दौऱ्यातील कसोटी संघाचे नेतृत्व दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावत याच्याकडे देण्यात आलेले आहे. तर वन-डे संघाचे नेतृत्व आर्यन जुयाल याच्याकडे देण्यात आले आहे.