मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वार्षिक पुरस्कार सोहळ्याला ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाची पाश्र्वभूमी असली तरी या वेळी संघटनेतील मातब्बर व्यक्तींनी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचेच चित्र पाहायला मिळाले. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या कार्यक्रमात माजी अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मुंबईतील क्लब्जच्या समस्या सोडवायला आपण नेहमीच तयार आहोत,’ असे सांगत आपली खेळी खेळली, तर रवी सावंत यांनी मुंबईतल्या खडूस क्रिकेटपटूंच्या आठवणींना उजाळा देत मुंबईची खेळाबाबतची निष्ठा, जिद्द सर्वाना सांगितली. रणजीमधील वेगवान शतकाबद्दल सचिन तेंडुलकरला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वासिम जाफर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आदित्य तरे, सिद्धेश लाड, सागर केरकर, अतुल सिंग आणि वैष्णव नार्वेकर यांनाही देदीप्यमान कामगिरीसाठी गौरवण्यात आले. मुंबईतील पाच माजी क्रिकेटपटूंना त्यांच्या अद्वितीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले, यामध्ये दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अॅबी कुरुविल्ला, चंद्रकांत पंडित आणि वृंदा भगत यांचा समावेश होता. क्रिकेट प्रशासक हा पुरस्कार या वेळी बाळ म्हाडदळकर आणि मंगेश भालेकर यांना देण्यात आला, तर दर्जेदार खेळपट्टी बनवणाऱ्या सुधीर नाईक यांनाही या वेळी गौरविण्यात आले. त्याचबरोबर यावर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या रणजी, २५-वर्षांखालील, १६, १४ आणि महिलांच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघांचाही सत्कार करण्यात आला.
अंकित चव्हाणच्या नावाने सारेच आश्चर्यचकित
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी चौकशी सुरू असताना अटक करण्यात आलेला आणि बीसीसीआयने निलंबित केलेल्या अंकित चव्हाणचे नाव सूत्रसंचालक बीसीसीआयचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक देवेंद्र प्रभुदेसाई यांनी घेतले आणि सर्वानाच आश्चर्य वाटले. या क्षणी नेमके काय करावे हे कोणालाच कळले नाही. पण यावर चर्वितचर्वण मात्र सुरू झाले. अखेर एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी नाव अनवधानाने घेतले गेल्याचे मान्य केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा