सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) संदेश सर्वप्रथम प्रसारमाध्यमांकडे आला आणि क्षणार्धात त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली. क्रिकेट हा धर्म आणि सचिन म्हणजे दैवत मानणाऱ्या भारतीय क्रिकेटसाठी हा फार धक्का होता. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्वाच्याच काळजाचा ठोका चुकला. गेली २३ वष्रे सचिन.. सचिन.. या जयघोषांनी देशोदेशीची मैदाने दणाणली. भारत-पाकिस्तान यांच्यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पध्रेसाठी रविवारी मुंबईच्या क्रिकेट सेंटर येथे राष्ट्रीय निवड समितीची बैठक सकाळी ९.३० वाजता सुरू झाली. पाकिस्तानविरुद्ध सचिन निश्चितपणे खेळणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण सकाळी निवड समितीची बैठक सुरू झाल्यानंतर पावणेदोन तासात सर्वात प्रथमच सचिनच्या बातमीने देशाला हादरविले.
‘‘क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारातून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असणे, हे मी माझे भाग्य समजतो. विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले असून २०१५मध्ये ही किमया पुन्हा साकारण्यासाठी भारतानं आतापासूनच जोमाने प्राथमिक तयारीला सुरुवात करायला हवी. भारतीय संघाला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. वर्षांनुवर्षे माझ्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या चाहत्यांचा, शुभचिंतकांचा मी सदैव ऋणी असेन’’, अशी सचिनची प्रतिक्रिया बीसीसीआयने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
समकालीन क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असे बिरूद मिरविणाऱ्या सचिनच्या नावावर जागतिक क्रिकेटमधील अनेक विक्रम आहेत. २००६मध्ये फक्त एकमेव सामना खेळून ट्वेन्टी-२० प्रकारात आपण देशासाठी अनुपलब्ध असल्याचे सचिनने स्पष्ट केले होते. आता यापुढे भारतासाठी कसोटी क्रिकेट तो खेळत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत सचिन खेळणार आहे.
४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने ४४.८३च्या सरासरीने १८,४२६ धावा काढल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या द्विशतकासह एकंदर ४९ शतके आणि ९६ अर्धशतके झळकावली आहेत. या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत १८ मार्चला पाकिस्तानविरुद्ध तो अखेरचा सामना खेळला. याचप्रमाणे १६ मार्चला त्याने आपल्या कारकिर्दीमधील महत्त्वाकांक्षी शंभरावे शतक साकारले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे १९८९मध्ये पाकिस्तानविरुद्धच सचिनने आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला.
२०११मध्ये भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. तेव्हा संघातील सर्वच क्रिकेटपटूंनी हा विश्वचषक सचिनला समर्पित केला. १९९९मध्ये दस्तुरखुद्द डॉन ब्रॅडमन यांनी सचिनच्या फलंदाजीत माझ्या फलंदाजीची झलक दिसते, असे कौतुकाने म्हटले होते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील रिकी पाँटिंग (१३७०४ धावा) त्याच्यापासून बराच दूर आहे.
*पदार्पण -१८-१२-८९ (पाकिस्तानविरुद्ध)
*पहिले शतक – ९-०९-१९९४ (विरुद्ध ऑस्ट्रेलिया ११० धावा)
* वर्षभरातील सर्वाधिक धावा – १९९८ (९ शतकांसह १८९४ धावा)
* सर्वाधिक भागीदारी – १९९९ (द्रविडसह दुसऱ्या विकेटसाठी ३३१ धावा)
* १०००० धावा – ३१-०३-२००१ २६६ वा सामना
* १५००० धावा – २९-०६-२००७ – ३८७ वा सामना
*शतकांचा विश्वविक्रम -१७ शतकांचा डेसमंड हेन्सचा विक्रम मोडला
*पहिले द्विशतक – २४-०२-२०१०
* ४४२ वा सामना -ग्वालियर
* विश्वविजेतेपद – २-४-२०११
* कारकीर्दीतले १०० वे शतक – १६-०३-२०१२ – मीरपूर
*निवृत्ती -२३-१२-२०१२
फलंदाजी
सामने ४६३
डाव ४५२
नाबाद ४१
धावा १८४२६
सर्वाधिक २००*
सरासरी ४४.८३
स्ट्राईक रेट ८६.२३
शतके ४९
अर्धशतके ९६
चौकार २०१६
षटकार १९५
गोलंदाजी
विकेट्स १५४
सर्वोत्तम ५/३२
सरासरी ४४.४८
पाच बळी २
क्षेत्ररक्षण
झेल १४०
* २६ वेळा सर्वाधिक शतकी सलामी (सौरव गांगुलीसोबत)
* ९० मैदानांवर खेळलेला जगातील एकमेव खेळाडू
* एका प्रतिस्पध्र्याविरुद्ध सर्वाधिक ९ शतके (ऑस्ट्रेलिया)
क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारातून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असणे, हे मी माझे भाग्य समजतो. विश्वचषक जिंकण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं असून २०१५मध्ये ही किमया पुन्हा साकारण्यासाठी भारतानं आतापासूनच जोमानं प्राथमिक तयारीला सुरुवात करायला हवी. भारतीय संघाला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. वर्षांनुवर्षे माझ्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या चाहत्यांचा, शुभचिंतकांचा मी सदैव ऋणी असेन.
– सचिन तेंडुलकर
विश्वचषकाच्या तयारीसाठी सचिनने निवृत्ती स्वीकारली -बीसीसीआय
मुंबई : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या २०१५च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला तयारी करता यावी, यासाठी सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१५च्या विश्वचषकाची तयारी भारताने करायला हवी, असे सचिनने आपल्या पत्रात नमूद केले. त्यानुसार हीच निवृत्तीची वेळ असल्याचे सचिनने स्पष्ट केले, असे बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.
सातत्याने होणाऱ्या टीकेमुळेच सचिनला निवृत्ती घेणे भाग पडले असावे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक झळकावले असते तर चांगले वाटले असते. सचिनने भारतीय क्रिकेटची निस्वार्थ सेवा केली. एकदिवसीय सामन्यात सचिनने खेळणे कमी केले होते, त्यामुळे लोकांना सचिनच्या अनुपस्थित राहण्याची लोकांना सवय झाली असावी. पण एकदिवसीय सामन्यात सचिन खेळणार नाही, हे भारतीय संघाचे फार मोठे नुकसान आहे.
– सुनील गावस्कर, भारताचे माजी कर्णधार
मला वाटते की तो पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळू शकला असता. सचिनचा हा निर्णय माझ्या मते बरोबर आहे. या निर्णयासाठी निवड समितीचा त्याच्यावर दबाव असेल, मला वाटत नाही. हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. सचिनला कुणीही वगळू शकत नाही.
– सौरव गांगुली, माजी कर्णधार
सचिनच्या एकदिवसीयमधून निवृत्तीने मी चकित झालो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून तो निवृत्त होत आहे, याचे समाधान आहे. कसोटीमधूनही अशा प्रकारे निवृत्त व्हायला त्याला आवडेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करणे हे त्याचे उद्दिष्ट असेल.
– के. श्रीकांत, माजी निवड समिती अध्यक्ष
एकदिवसीयमधून निवृत्त होण्याचा सचिनचा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. जर तो कसोटी सामने खेळणार असेल तर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येसुद्धा खेळत राहायला हवे होते. आपण एका हंगामात २५ एकदिवसीय सामने खेळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सातत्याने खेळत राहणे महत्त्वाचे आहे.
– दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार
सचिनच्या निर्णयाचा आदर करायला हवा. गेले काही दिवस तो निवृत्ती घेणार असे चित्र होते. कसोटी क्रिकेटसाठी आपण तंदुरुस्त असल्याचे त्याला वाटत आहे, म्हणूनच त्याने कसोटीतून निवृत्ती पत्करलेली नाही. निवृत्ती कधी घ्यावी याबाबत अचूक निर्णय तोच घेऊ शकतो. कारण तोच स्वत:च्या शरीराची नस ओळखतो. गेले काही दिवस तो का निवृत्त होत नाही, असा सवाल क्रिकेटरसिक विचारीत होते. आता त्याने का निवृत्ती घेतली, असा प्रश्न हीच मंडळी विचारीत आहेत. भारतीय लोकांची मानसिकता अजब आहे.
– बापू नाडकर्णी, बुजुर्ग क्रिकेटपटू.
मास्टर्स. ४६३ सामने, २३ वर्षे, १८४२६ धावा!!! या आकडय़ांच्या आसपासही पोहोचणे कुणाला जमणार नाही. सचिन, तुला त्रिवार, त्रिवार, त्रिवार वंदन. सचिन तेंडुलकर महान फलंदाज आहे. एक माणूस म्हणूनही तो असामान्य आहे. चांगला मित्र, ज्याचे अनुकरण करावे असे वाटेल असा माणूस. समस्त भारतीयांना अभिमानास्पद. भारताचा खराखुरा सुपुत्र.
– हरभजन सिंग, क्रिकेटपटू
सचिनने निवृत्ती पत्करल्यानंतर मी फारच भावुक झालो. १८ हजारपेक्षा जास्त धावा. त्याचा एकदिवसीयमधील आकडेवारी केवळ अचंबित करणारी आहे. तू महान फलंदाज आहेस आणि कायमच माझ्या आणि समस्त भारतीयांच्या हृदयात राहशील. आपल्या देशाचा अभिमान. भारतीय क्रिकेटला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी तुला सलाम!
– युवराज सिंग, क्रिकेटपटू
क्रिकेट खेळण्याचे आणि क्रिकेट बघण्याचे मुख्य कारण म्हणजे सचिन तेंडुलकर.. काही शब्दच नाहीत.
– सुरेश रैना, क्रिकेटपटू
माझा मार्गदर्शक, माझा हीरो, माझा मित्र. आणि मी क्रिकेटच्या प्रेमात पडण्याचे मुख्य कारण. हृदयाला धक्का पोहोचला.
– रोहित शर्मा, क्रिकेटपटू
प्रत्येक भारतीयासाठी एक प्रेरणास्थान आणि महान खेळाडू.
– गौतम गंभीर, क्रिकेटपटू
क्रिकेटमधील सर्वोत्तम महान खेळाडूसह एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या कारकिर्दीतील अत्युच्य क्षण अर्थात विश्वचषक विजयाचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. सचिन, भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. एकदिवसीय क्रिकेट तुझ्यावाचून पोरके होणार आहे.
– रवीचंद्रन अश्विन, क्रिकेटपटू
सचिनला आदर्श मानत लहानपणापासून क्रिकेट खेळलो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नसण्याने मोठी पोकळी निर्माण होणार आहे. सचिन पुन्हा एकदिवसीयमध्ये भारताची जर्सी परिधान करणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. तुझ्या कारकिर्दीला माझा सलाम.
– अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू
सार्वकालीन महान खेळाडू आणि माझा चांगला मित्र सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होतोय. भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी मनापासून धन्यवाद.
– शरद पवार, आयसीसीचे माजी अध्यक्ष
आकडे कधीही खोटे बोलत नाहीत. ते नेहमी खरीखुरी कहाणी तुमच्यासमोर मांडतात. वेल डन सचिन! अविश्वसनीय एकदिवसीय कारकीर्द..
– केव्हिन पीटरसन, इंग्लंडचा क्रिकेटपटू
सचिन हा महान क्रिकेटपटू असून त्याच्या निवृत्तीची घोषणेमुळे त्याच्या कारकीर्दीची झलक डोळ्यासमोर आली. त्याने मिळविलेल्या यशाची लांबलचक यादीच डोळ्यांसमोर येते. सचिन तेंडुलकर अद्वितीय आहे आणि अद्वितीयच राहील.
– अमिताभ बच्चन, बॉलीवूड अभिनेते
‘सचिन को भूल नही पाऊंगा, जब तक है जान, जब तक है जान’
– शाहरूख खान, बॉलीवूड अभिनेता
सचिनच्या निवृत्तीमुळे क्रिकेट हा खेळ बऱ्याच कालावधीसाठी आपली चमक हरवून बसेल. सचिन तू मैदानावर दिसणार नाहीस. आम्हा सर्वानाच तुझी कमतरता जाणवेल.
– मनोज बाजपेयी, बॉलीवूड अभिनेता
सचिन एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. परंतु आपल्याला तो कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत.
– मंदिरा बेदी, अभिनेत्री
एक दिवसीय क्रिकेटमधील शतके
क्र.धावा प्रतिस्पर्धी संघ स्थळ दिनांक
१)११० ऑस्ट्रेलिया कोलंबो ९ सप्टेंबर १९९४
२)११५ न्यूझीलंड वडोदरा २८ ऑक्टोबर १९९४
३)१०५ वेस्ट इंडिज जयपूर ११ नोव्हेंबर १९९४
४)११२ श्रीलंका शारजा ९ एप्रिल १९९५
५)१२७ केनिया कटक १८ फेब्रुवारी १९९६
६)१३७ श्रीलंका नवी दिल्ली २ मार्च १९९६
७)१०० पाकिस्तान सिंगापूर ५ एप्रिल १९९६
८)११८ पाकिस्तान शारजा १५ एप्रिल १९९६
९)११० श्रीलंका कोलंबो २८ ऑगस्ट १९९६
१०)११४ द. आफ्रिका मुंबई १४ डिसेंबर १९९६
११)१०४ झिम्बाब्वे बेनोनी ९ फेब्रुवारी १९९७
१२)११७ न्यूझीलंड बंगळुरू १४ मे १९९७
१३)१०० ऑस्ट्रेलिया कानपूर ७ एप्रिल १९९८
१४)१४३ ऑस्ट्रेलिया शारजा २२ एप्रिल १९९८
१५)१३४ ऑस्ट्रेलिया शारजा २४ एप्रिल १९९८
१६)१०० केनिया कोलकाता ३१ मे १९९८
१७)१२८ श्रीलंका कोलंबो ७ जुलै १९९८
१८)१२७ झिम्बाब्वे बुलावायो २६ सप्टेंबर १९९८
१९)१४१ ऑस्ट्रेलिया ढाका २८ ऑक्टोबर १९९८
२०)११८ झिम्बाब्वे शारजा ८ नोव्हेंबर १९९८
२१)१२४ झिम्बाब्वे शारजा १३ नोव्हेंबर १९९८
२२)१४० केनिया ब्रिस्टॉल २३ मे १९९९
२३)१२० श्रीलंका कोलंबो २९ ऑगस्ट १९९९
२४)१८६ न्यूझीलंड हैदराबाद ८ नोव्हेंबर १९९९
२५)१२२ द. आफ्रिका वडोदरा १७ मार्च २०००
२६)१०१ श्रीलंका शारजा २० ऑक्टोबर २०००
२७)१४६ झिम्बाब्वे जोधपूर ८ डिसेंबर २०००
२८)१३९ ऑस्ट्रेलिया इंदौर ३१ मार्च २००१
२९)१२२ वेस्ट इंडिज हरारे ४ जुलै २००१
३०)१०१ द. आफ्रिका जोहान्सबर्ग ५ ऑक्टोबर २००१
३१)१४६ केनिया पर्ल २४ ऑक्टोबर २००१
३२)१०५ इंग्लंड चेस्टर-ले-स्ट्रीट ४ जुलै २००२
३३)११३ श्रीलंका ब्रिस्टॉल ११ जुलै २००२
३४)१५२ नामिबिया पिटरमॅरिझबर्ग २३ फेब्रुवारी २००३
३५)१०० ऑस्ट्रेलिया ग्वालियर २६ ऑक्टोबर २००३
३६)१०२ न्यूझीलंड हैदराबाद १५ नोव्हेंबर २००३
३७)१४१ पाकिस्तान रावळपिंडी १६ मार्च २००४
३८)१२३ पाकिस्तान अहमदाबाद १२ एप्रिल २००५
३९)१०० पाकिस्तान पेशावर ६ फेब्रुवारी २००६
४०)१४१ वेस्ट इंडिज कुआलालंपूर १४ सप्टेंबर २००६
४१) १०० वेस्ट इंडिज वडोदरा ३१ जानेवारी २००७
४२)११७ ऑस्ट्रेलिया सिडनी २ मार्च २००८
४३)१६३ न्यूझीलंड ख्राईस्टचर्च ८ मार्च २००९
४४) १३८श्रीलंका कोलंबो १४ सप्टेंबर २००९
४५) १७५ ऑस्ट्रेलिया हैदराबाद ५ नोव्हेंबर २००९
४६)२०० द. आफ्रिका ग्वालियर २४ फेब्रुवारी २०१०
४७)१२० इंग्लंड बंगळुरू २७ फेब्रुवारी २०११
४८)१११ द. आफ्रिका नागपूर १२ मार्च २०११
४९)११४ बांगलादेश मिरपूर १६ मार्च २०१२