सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) संदेश सर्वप्रथम प्रसारमाध्यमांकडे आला आणि क्षणार्धात त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली. क्रिकेट हा धर्म आणि सचिन म्हणजे दैवत मानणाऱ्या भारतीय क्रिकेटसाठी हा फार धक्का होता. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्वाच्याच काळजाचा ठोका चुकला. गेली २३ वष्रे सचिन.. सचिन.. या जयघोषांनी देशोदेशीची मैदाने दणाणली. भारत-पाकिस्तान यांच्यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पध्रेसाठी रविवारी मुंबईच्या क्रिकेट सेंटर येथे राष्ट्रीय निवड समितीची बैठक सकाळी ९.३० वाजता सुरू झाली. पाकिस्तानविरुद्ध सचिन निश्चितपणे खेळणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण सकाळी निवड समितीची बैठक सुरू झाल्यानंतर पावणेदोन तासात सर्वात प्रथमच सचिनच्या बातमीने देशाला हादरविले.
‘‘क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारातून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असणे, हे मी माझे भाग्य समजतो. विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले असून २०१५मध्ये ही किमया पुन्हा साकारण्यासाठी भारतानं आतापासूनच जोमाने प्राथमिक तयारीला सुरुवात करायला हवी. भारतीय संघाला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. वर्षांनुवर्षे माझ्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या चाहत्यांचा, शुभचिंतकांचा मी सदैव ऋणी असेन’’, अशी सचिनची प्रतिक्रिया बीसीसीआयने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
समकालीन क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असे बिरूद मिरविणाऱ्या सचिनच्या नावावर जागतिक क्रिकेटमधील अनेक विक्रम आहेत. २००६मध्ये फक्त एकमेव सामना खेळून ट्वेन्टी-२० प्रकारात आपण देशासाठी अनुपलब्ध असल्याचे सचिनने स्पष्ट केले होते. आता यापुढे भारतासाठी कसोटी क्रिकेट तो खेळत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत सचिन खेळणार आहे.
४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने ४४.८३च्या सरासरीने १८,४२६ धावा काढल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या द्विशतकासह एकंदर ४९ शतके आणि ९६ अर्धशतके झळकावली आहेत. या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत १८ मार्चला पाकिस्तानविरुद्ध तो अखेरचा सामना खेळला. याचप्रमाणे १६ मार्चला त्याने आपल्या कारकिर्दीमधील महत्त्वाकांक्षी शंभरावे शतक साकारले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे १९८९मध्ये पाकिस्तानविरुद्धच सचिनने आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला.
२०११मध्ये भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. तेव्हा संघातील सर्वच क्रिकेटपटूंनी हा विश्वचषक सचिनला समर्पित केला. १९९९मध्ये दस्तुरखुद्द डॉन ब्रॅडमन यांनी सचिनच्या फलंदाजीत माझ्या फलंदाजीची झलक दिसते, असे कौतुकाने म्हटले होते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील रिकी पाँटिंग (१३७०४ धावा) त्याच्यापासून बराच दूर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा