Sachin Tendulkar Video : भारतीय क्रिकेट संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचा पुढील कर्णधार म्हणून एम एस धोनीचे नाव सुचवले होते, हे सर्वांनाच माहित आहे. २००७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सचिन तेंडुलकरला भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली होती. पण सचिनने ही संधी नाकारत एम एस धोनीचे नाव सुचवले होते, पण कर्णधारपद नाकारत धोनीचे सुचवण्यामागचे कारण काय होते, हे सचिनने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
धोनीला खेळताना पाहणाऱ्या सचिनने त्याच्यातील नेतृत्त्व गुण, त्याचा शांत संयमी स्वभाव पाहत बीसीसीआयला धोनीचे नाव सुचवले होते. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हीडिओमध्ये सचिन तेंडुलकरने धोनीचे नाव सुचवण्यामागचे कारण सांगितले आहे.
Sachin Tendulkarने धोनीचं नाव कर्णधारपदासाठी का सुचवलं?
सचिन तेंडुलकर म्हणाला, “भारतीय संघाचे कर्णधारपद नाकारण्याचे खरे कारण होते, ते म्हणजे माझी तब्येत. त्यावेळेस मला फार शारिरीक त्रास होत होता, माझं शरीर तेव्हा मला साथ देत नव्हतं आणि मला आठवते ओव्हल मैदानावरील सामन्यापूर्वी श्री. शरद पवार यांची इंग्लंडमध्ये भेट झाली. तेव्हा ते म्हणाले ‘माझ्या मते तू नेतृत्वाची भूमिका घ्यावी.’ मी म्हणालो की सर एक खेळाडू म्हणून माझी नेतृत्वाची भूमिका नेहमीच असेल, माझ्यासमोर फक्त कर्णधार हा टॅग नसेल. पण मी जोपर्यंत भारतासाठी खेळत आहे आणि माझ्यात क्षमता आहे तोपर्यंत मी नेहमीच देशासाठी माझे १०० टक्के देईन. मी तुम्हाला एक नाव सुचतो, ज्याला क्रिकेटचे फार चांगले ज्ञान आहे. मी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी असल्याने महेंद्रसिंग धोनीशी संवाद साधायचो आणि त्यावरून मी त्याचं नाव सुचवू शकलो. त्यानंतर पुढे जे घडलं तो इतिहास आहे.”
हेही वाचा – VIDEO: “कर्णधारपद आणि प्रसिद्धी मिळताच विराट बदलला, पण रोहित…” अनुभवी फिरकीपटू नेमकं काय म्हणाला?
When Sachin Tendulkar recommended Dhoni’s name instead on being offered captaincy
— Rohit Raina (@RohittRaina) July 15, 2024
pic.twitter.com/oCtCTSeYpx
भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वाखाली खूप प्रगतीही केली आणि आयसीसी ट्रॉफीही जिंकल्या. धोनी हा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयससीसीच्या महत्वाच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. ज्यामध्ये २००७ टी-२०विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे. धोनीच्या चाळीशीनंतरही अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळताना दिसतो.