Sachin Tendulkar Kashmir Willow Bat Memories : भारताचा महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची चाहत्यांमध्ये क्रेझ खूप जास्त आहे. निवृत्तीनंतरही सचिनची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झालेले दिसतात. सचिनही आपल्या चाहत्यांना निराश करत नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडलेला असतो. नुकतीच सचिनने काश्मीरला भेट दिली. त्याच्या भेटीदरम्यान त्यानी पुलवामा जिल्ह्यातील बॅट फॅक्टरी गाठली आणि तिथे काश्मीर विलो बॅट्स कशी बनवताना पाहिले. आता सचिनने या बॅट कारखान्यात पोहोचल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सचिन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पुलवामाच्या बॅट फॅक्टरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो फॅक्टरीत काश्मीर विलो बॅट धरलेला दिसत आहे. या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकरने काश्मीर विलो बॅटशी संबंधित त्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मला मिळालेली पहिली बॅट माझ्या मोठ्या बहिणीने दिली होती, जी काश्मीर विलो बॅट होती. आता मी इथे आलो आहे, मला काश्मीर विलोला भेटायचे आहे.’
व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर ज्या लाकडापासून बॅट बनवली जाते, त्याकडे बारकाईने पाहताना दिसत होता. सचिनही बॅटच्या ग्रेनबद्दल बोलताना दिसला. त्याने सांगितले की त्याच्याकडे असलेल्या सर्वोत्तम बॅटमध्ये ५ ग्रेन आहेत. आता साधारणपणे ११-१२ ग्रेन येतात. व्हिडीओमध्ये सचिन बॅटचे पिंग तपासतानाही दिसत आहे.
हेही वाचा – WPL 2024 : महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनात बॉलीवूडची झलक, शाहरुख-वरूणसह ‘हे’ स्टार्स करणार परफॉर्म
मास्टर ब्लास्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल –
मात्र, सचिन तेंडुलकरची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर काश्मीर विलो बॅट आणि बॉलसोबत खेळताना दिसत आहे. मास्टर ब्लास्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
सचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. यानंतर सचिन तेंडुलकरने आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो स्थानिक लोकांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहे.सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत जगातील अनेक महान गोलंदाजांचा मारा केला होता. सचिन हा जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि दररोज त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो.