पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला काल हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंझमाम-उल-हकची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले, की सध्या इंझमामची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर क्रिकेटविश्वातून अनेक खेळाडूंनी इंझमामसाठी प्रार्थना केली. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही इंझमामसाठी एक ट्वीट केले आहे.
सध्या यूएईमध्ये मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन देणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्वीट करून त्याचा मित्र आणि जुना प्रतिस्पर्धी इंझमाम-उल-हकसाठी संदेश पाठवला आहे. सचिनने लिहिले, ‘इन्झमाम तू लवकर बरा हो, मला हेच हवे आहे. तू नेहमीच शांत पण मजबूत आणि मैदानावर एक फायटर राहिला आहेस. मी आशा आणि प्रार्थना करतो, की तू या परिस्थितीतून बाहेर पडशील. लवकर बरा हो.” सचिन व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गज व्यक्तींनी इंझमाम-उल-हकच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
इंझमाम-उल-हक पाकिस्तान संघाचा यशस्वी क्रिकेटपटू आहे. १९९२ च्या विश्वचषकात त्याने पाकिस्तानला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी ३७५ सामन्यांमध्ये सर्वाधिक ११७०१ धावा केल्या आहेत. त्याने कसोटी स्वरूपात ११९ सामने खेळले, ज्यात त्याने ८८२९ धावा केल्या आहेत. २००७च्या आयसीसी वर्ल्डकपमध्ये तो शेवटचा पाकिस्तानकडून खेळला.
पाकिस्तान संघासाठी इंझमामने फलंदाजी सल्लागार म्हणून काम केले आहे, तसेच २०१६-२०१९दरम्यान राष्ट्रीय संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणूनही काम केले आहे. या पदावर असताना टीका झाल्यानंतर त्याने अचानक पदाचा राजीनामा दिला. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्याने भूमिका बजावली आहे. सध्या, तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सध्याचे क्रिकेट आणि खेळाडूंबद्दल आपले मत देताना दिसतो.