‘‘मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या ऐतिहासिक सामन्याविषयी एका गटाचे प्रमुख भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खेळ विकास महाव्यवस्थापक असल्याने त्यांना काही बोलता आले नाही, तर अन्य एका गटाच्या प्रमुखांना नेरुळच्या क्रिकेट स्टेडियमचे भले करायचे असल्याने त्यांनीही याबाबत एकही शब्द काढला नाही. पण बाळ म्हाडदळकर गट सचिनचा दोनशेवा सामना वानखेडेवरच व्हावा, यासाठी ठामपणे उभा राहिला आणि त्यामध्ये यशस्वी ठरला. मी स्वत: बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली आणि त्यामुळेच सचिनच्या दोनशेव्या सामन्याचे यजमानपद वानखेडेला मिळाले,’’ अशी स्पष्टोक्ती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.
‘‘एमसीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळल्यापासून बरीच कामे आम्ही मार्गे लावली आहेत. क्रिकेटसाठी शहर आणि उपनगरांमध्ये बऱ्याच सोयी-सुविधा पुरवल्या आहेत. गेल्या वर्षभरात बऱ्याच गटांमध्ये मुंबईने बाजी मारली आहे. कांगा लीग आणि काही स्पर्धाची पुनर्बाधणी आम्ही केली आहे. त्याचबरोबर वानखेडेच्या पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे हे नामकरण आणि वांद्रे-कुर्ला संकुलाच्या क्रिकेट अकादमीला शरद पवार यांचे नाव देण्याचे ठरवले आहे. पाच वर्षे रखडलेला एमसीएचा वार्षिक पुरस्कार सोहळा आम्ही चालू केला,’’ असे सावंत यांनी सांगितले.
सध्याच्या एमसीच्या कार्यकारिणीवर कायदेशीर बाबींवर जास्त खर्च केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पण एमसीएने कोणाविरोधात याचिका दाखल केली नसून एमसीएविरोधात याचिका दाखल झाल्या आहेत, त्याविरुद्ध लढण्यासाठी हा खर्च होत आहे. संघटना चालवायची म्हणजे कायदेशीर बाबी येणारच आणि त्यासाठीच आम्ही खर्च करत आहोत, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
सावंत पुढे म्हणाले की, ‘‘यापुढे कार्यालयीन क्रिकेटची पुनर्बाधणी करण्याचा आमचा मानस आहे, त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयीन स्पर्धा आणि विविध वयोगटांतील स्पर्धाचे एकत्रीकरणाचा आमचा विचार आहे, जेणेकरून या स्पर्धाचे गतवैभव पुन्हा मिळवता येईल. त्याचबरोबर गरवारे क्लबच्या जुन्या इमारतीमध्ये आमचा क्रीडा वस्तुसंग्रहालय बनवण्याचा मानस आहे.’’

Story img Loader