मॅचच्या आदल्या दिवशी मी रात्री झोपू शकत नव्हतो, असा खुलासा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने केलाय. मी गोलंदाजांना कसा सामोरा जाईन, ते बॉल कसा टाकतील, तो बॉल खेळण्यासाठी माझ्याकडे कोणते पर्याय आहेत? याचा सतत विचार करत असायचो, मात्र कालांतराने मी स्वतःला स्वीकारण्यास सुरुवात केली, असं सचिनने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
“जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी असेल तर तुम्ही नक्कीच अस्वस्थ व्हाल. मला माझ्या क्रिकेटची काळजी होती. प्रत्येक वेळी मला चांगलं खेळायचं होतं. माझ्या कारकार्दीची पहिली १२ वर्षे मी मॅच आधी नीट झोपू शकत नव्हतो. मी गोलंदाजांना कसा सामोरा जाईन, ते बॉल कसा टाकतील, तो बॉल खेळण्यासाठी माझ्याकडे कोणते पर्याय आहेत? याचा सतत विचार करत असायचो. मात्र, कालांतराने मी स्वतःला स्वीकारण्यास सुरुवात केली आणि माझे शरीर आणि मन खेळण्यासाठी तयार होऊ लागले. मला काय वाटतंय, या भावनेशी मी लढण्याची गरज नाहीए. मी रात्री साडेबारा किंवा एक वाजता टीव्ही पाहत, संगीत ऐकत असलो किंवा जे काही असलो ते माझ्या खेळाच्या तयारीचा एक भाग आहे, असं मानण्यास मी सुरुवात केली. जितके मी स्वतःला समजून घेऊ लागलो, तितक्या गोष्टी सामान्य होत गेल्या,” असं सचिनने सांगितलं. यावेळी सचिनने खेळात टेक्नॉलॉजीचं महत्व, फिल्डिंग करत असताना शरीराच्या हालचाली अशा अनेक विषयांवर चर्चा केली.
क्रीडा क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बोलताना सचिनने एक किस्सा सांगितला. “तंत्रज्ञानामुळे सर्व काही बदलले आहे. २००२ मध्ये ड्रेसिंग रूममध्ये एक लॅपटॉप आणला होता आणि मी म्हणालो, ड्रेसिंग रुममध्ये लॅपटॉप काय करणार? मात्र, नंतर मला लॅपटॉपचे फायदे कळू लागले. टीमची मीटिंग असेल आणि जुन्या मॅचमधील गोलंदाज किंवा फलंदाजाची एखादी मूमेंट सांगायची असेल तर ती प्रत्येकालाच लक्षात असेल असं नाही. मात्र, लॅपटॉपमध्ये सर्व डेटा असल्याने आम्हाला ती अनेकदा पाहता यायचं. त्याचा खेळासाठी आम्हाला फायदा व्हायचा.”
तंत्रज्ञानाच्या वैयक्तिक फायद्याबद्दल बोलताना सचिन म्हणाला, “मी माझी फलंदाजी पाहण्याऐवजी विरोधी गोलंदाजांचा खेळ बघायचो. ते माझ्यावर वेळ घालवायचे त्यापेक्षा जास्त वेळ मी त्यांच्यावर घालवायचो. त्यांच्या बारीक हालचाली बघायचो. एकूणच मला माझ्या खेळाबद्दल विचार करायला खूप आवडतं. एखाद्या दिवशी नेट सेशन चांगले झाले नाही, तर तो दिवस माझ्यासाठी वाईट होता असं मी समजायचो. पण तरीही अस्वस्थ व्हायचो. क्रिकेट हेच माझे आयुष्य आहे आणि जर ते बरोबर नसेल तर मी अस्वस्थ होणारच. जोपर्यंत दुसऱ्या दिवशी मी चांगलं खेळायचो नाही तोपर्यंत मला विचित्र वाटायचं. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जे काही करताय त्याचा पूर्णपणे आनंद घेत नाहीत. बॅटवर आदळणाऱ्या प्रत्येक चेंडूचा आवाज मला आत्मविश्वास देतो,” असं सचिन सांगतो.
सिडनीमध्ये २००३-०४ मधील ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये काढलेल्या २४१ धावांबद्दल बोलताना सचिन म्हणतो, “मी ठरवून तेवढ्या धावा केल्या नव्हत्या. त्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन टीमने माझ्यापासून दूर गोलंदाजी केली. त्यांना डॉट बॉल काढायचे होते. त्यामुळे ते विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्टकडे चेंडू फेकायचे. त्यांना वाटलं मी वैतागेल. मला त्यांचा गेम लक्षात आला. मग मी म्हटलं, तुम्ही माझ्या संयमाची परीक्षा घेताय मग मी पण तुमच्या संयमाची परीक्षा घेईल, पाहू कोण आधी हरतंय. मला एक दिवस, दीड किंवा दोन दिवस फलंदाजी करावी लागली तरी मी ते करण्यास तयार आहे. अखेरीस, गोलंदाज हरले. या मॅचमध्ये कव्हर ड्राईव्ह खेळणार नाही, असं ठरवूनच मी मैदानात उतरलो होतो.” असं सचिनने सांगितलं.
लाईव्ह क्रिकेट बघण्याबद्दल सचिन म्हणाला, “मी जेव्हाही माझ्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत क्रिकेट पाहतो तेव्हा बऱ्याचदा पुढे काय होईल, हे मी सांगत असतो. गोलंदाजाने काय करण्याचा प्रयत्न केला किंवा फलंदाज शेवटचे दोन चेंडू कसा खेळला, असं सांगतो. मला मित्र आणि कुटुंबीयांसोबत या गोष्टी करायला आवडतात.”